
संतोष आंधळे
प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाच्या उपचारात किती महत्त्वाची भूमिका बजावते याबाबत मतमतांतरे असली तरी अजूनही राज्याच्या अनेक भागांत या थेरपीचा सर्रास वापर केला जात आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर या थेरपीला खूप महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र हा प्लाझ्मा मिळविण्याचे काम फार जिकिरीचे असते. कारण ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा व्यक्तींनी तो दान करणे अपेक्षित असते, मात्र असे अनेकवेळा होताना दिसत नाही. त्यामुळे प्लाझ्मा मिळविताना रुग्णांच्या नातेवाईकाची खूप दमछाक व्हायची. मात्र हा त्रास टाळण्याकरिता पुण्यातील काही संघटना एकत्र आल्या असून त्यांनी ज्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे त्यांना दूरध्वनीवर संपर्क करून त्यांना प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याकरिता त्यांनी ‘प्लाझ्मा वॉरिअर’ नावाने विशेष टीम तयार केली असून त्यामार्फत हे काम सुरू केले आहे, त्या माध्यमातून आतापर्यंत 100 पेक्षा अधिक नागरिकांनी प्लाझ्मा दान केले आहे.
याप्रकरणी वंदे मातरम् संघटनेचे वैभव वाघ यांनी बोलताना सांगितले की, ‘पुणे येथे प्लाझ्मा हवाय यासाठी दिवसभर मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना रोज फोन येत होते. त्यावेळी आम्ही संपर्क करून प्लाझ्मा देत होतो, मात्र मागणी जास्त वाढली तेव्हा आम्ही ठरविले की यासाठी एकत्रितपणे मोठे काम उभारावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील कोरोनाचा संसर्ग ज्यांना झाला आहे अशा 70-80 हजार व्यक्तींची माहिती मिळवली. आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की ‘प्लाझ्मा वॉरिअर’ उपक्रम सुरू करत आहोत. त्यासाठी काम करण्यासाठी पुढे या. 100 ते 120 कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. आम्ही जी कोरोनाबाधितांची माहिती मिळविली त्यातून 45 वयाच्या खालील पुरुषांची माहिती वेगळी काढली. त्यातून 19 हजार नवे मिळाली. त्यातील 100-200 क्रमांकाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सर्वांना कॉल करून प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यांनी त्यांच्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन प्लाझअमा दान करणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांनी प्लाझअमा दान केले आहे. काही नागरिक अँटीबॉडीज व्यवस्थित आल्या नाहीत म्हणून दान करत नसल्याचे अनुभवसुद्धा या काळात आम्हाला आले आहे. वंदे मातरम् संघटनेसोबत युवा फिनिक्स सोसायटीचा या कामात सहभाग आहे.’
पुणे येथील वंदे मातरम् संघटनेने या उपक्रमाची सुरुवात केली असून त्यांनी गेल्या वर्षभराच्या कोरोना काळात मोठे सामाजिक काम उभारले असून अन्नाची पाकिटे वाटप करणे, रुग्णांना मदत करणे आदी सामाजिक कामात सहकार्य करत आहे. वर्षभर अनेक वेळा त्यांना रक्तदानासाठी किंवा प्लाझ्मादानासाठी फोन येत होते. मात्र वैयक्तिक पातळीवर ते काम त्यावेळी होत असे. मात्र प्लाझ्माची गरज संपूर्ण राज्यात असून यासाठी काहीतरी एकत्रित प्रयत्न व्हायला हवे होते. याकरिता या संघटनेने या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
या प्लाझ्मा थेरपीत कोरोना आजारापासून मुक्त झालेल्या व्यक्तीतील रक्तद्रव काढून तो कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरला जाईल. ज्यांना श्वास घेण्यासाठी (ऑक्सिजन मशीन ) यंत्रांची गरज असून ते गंभीर स्वरूपाचे असे रुग्ण आहेत त्या रुग्णांना हा प्लाझ्मा त्यांच्या शरीरात सोडण्यात येईल. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तीच्या रक्तात विषाणूविरोधात निर्माण झालेल्या अँटीबॉडीस ज्या रुग्णामध्ये प्लाझ्मा दिला आहे त्या रुग्णास मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती व्यवस्था (इम्यून सिस्टम) ही या विष्णूशी जोरदार लढा देते. यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि रुग्ण उपचाराला लवकर साथ देऊन बरा होण्यास मदत होते.































































