भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या; दोन जखमी

59

सामना प्रतिनिधी, नाशिक

जेलरोड परिसरात रविवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमाप्रसंगी काही तरुणांमध्ये नाचण्यावरून वाद झाला. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या रोहित वाघ या तरुणाची टोळक्याने कोयत्यांनी वार करून निर्घृण हत्या केली. त्याच्या दोन जखमी मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जेलरोडच्या चंपानगरी भागात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुभाष रोडवरील पवारवाडी येथील रहिवाशी अविनाश विष्णू वाघ यांच्या आत्येबहिणीचा रविवारी हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी तेथे आलेल्या रोहित पारखे, करण केदारे, विशाल जाधव, सोनू गायकवाड, बाळा केदारे, ललित वागळे, मयूर गायकवाड, सागर गांगुर्डे, समाधान आव्हाड, अमित वाघमारे, आशीष वाघमारे व इतर दोनजण यांच्यामध्ये नाचण्यावरून वाद झाला.

अविनाश यांचा चुलतभाऊ रोहित प्रमोद वाघ (23) हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता रोहित पारखे आणि करण केदारे यांनी त्याच्यावरच कोयत्यांनी वार केले. हे घाव वर्मी लागल्याने रोहितचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असणारे अलकेश राजू जॉन (24) व रितेश विनायक पांडव (21) हे जखमी आहेत. यानंतर घटनास्थळावरून पळून जाताना टोळक्याने अनेकांना विटा फेकून मारल्या, अशी फिर्याद अविनाश वाघ यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून तेराजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेरापैकी सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या