हळद माखली रक्ताने, भांडणात मध्यस्थी करणाऱ्याची हत्या

अलिबागमधील चौकच्या बीड आदिवासी वाडीतील हळद रक्तानी माखली. शर्ट काढून नाचू नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर दोघांनी लोखंडी कालथ्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अनंता वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास वाघमारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बाळू मुखणे याला केळवली स्थानकातून अटक केली.

बीड आदिवासी वाडीतील कुमार पवार याची हळद होती. या समारंभात नाचताना बाळू मुखणे आणि प्रकाश पवार हे दोघे शर्ट काढून नाचत होते. विलास वाघमारे यांनी हळदी समारंभात महिला, मुली असल्याने शर्ट काढून नाचू नका असे सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी लोखंडी कालथ्याने त्यांना मारहाण केली. आपल्या भावाला मारताना पाहून अनंता वाघमारे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. यात ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच अनंता यांचा मृत्यू झाला.