
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या ‘आमदार चषक’ युवा महोत्सवाला मालवण-कुडाळमधील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांची मागणी लक्षात घेता पुढील वर्षीचा युवा महोत्सव जिल्हास्तरीय आयोजीत केला जाईल, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी मालवणमध्ये केले. आमदार चषक युवा महोत्सवाचा सांगता सोहळा शनिवारी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात झाला. ‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता, दत्ता व आण्णा नाईक यांची उपस्थिती सोहळ्याचे खास आकर्षण होती.
यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, संदेश पारकर, रुची राऊत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, पालिका बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, हर्षद गावडे, युवासेना उपजिल्हाधिकारी राजू जांभेकर, तालुका युवसेनाप्रमुख मंदार गावडे, अमित भोगले, तपस्वी मयेकर, राजू परब, उमेश मांजरेकर, अवधूत मालंडकर, भाई कासवकर, अनंत पाटकर, देवयानी मसुरकर, अंजना सामंत, शिल्पा खोत, दीपा शिंदे यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
वैयक्तिक गायन, मिमिक्री स्पर्धेच्या अंतिम फेऱ्या व काव्यवाचन, ग्रुपडान्स, रॅम्प वॉक या स्पर्धा सायंकाळी उशिरापर्यंत झाल्या. युवा महोत्सवास कुडाळ मालवण मधील विविध महाविद्यालयांतील शेकडो विध्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तरुणाईचा रंग…. आमदारांसंग या टॅग लाईनखाली आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक चांगले व्यासपीठ ठरणार आहे. संपूर्ण राज्यात आदर्शवत ठरेल असा हा महोत्सव ठरेल, असा विश्वास शिवसेना जिल्हा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे व अन्य मान्यवरांनी व्यक्त केला. आमदार वैभव नाईक यांनी आयोजित केलेला हा महोत्सव खरोखरच अभिनंदनीय आहे, असे सांगत रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक यांनी आमदार वैभव नाईक यांचे कौतुक केले. तर शेवंता, माई, व दत्ता नाईक या कलाकारांनीही महोत्सवाचे कौतुक केले.





























































