
अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असून त्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. हा प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रशासनाकडून दीड दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. हा वेळ कमी असून विद्यार्थ्यांची अर्ज भाग एक व दोन एकाचवेळी भरण्यासाठी धावपळ होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने अर्ज भरण्याचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी युवासेनेने केली आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रियेला 21 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र प्रशासनाकडून प्रवेश अर्ज भाग क्रमांक एकमधील दुरुस्ती आणि दुसरा भाग भरण्यासाठी फक्त 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा दीड दिवसाचा अवधी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील विद्यार्थी दिलेल्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भाग एक व दोन भरण्यासाठी एकाचवेळी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे संकेतस्थळावर ताण येऊन तो बंद पडू शकतो. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थी पूर्ण अर्ज भरण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे अर्ज भरण्याचा कालावधी वाढवून मिळावा या मागणीसाठी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परमात्मा यादव, किसन सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक सुनील सावंत यांची भेट घेतली आणि तत्काळ उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती केली.


























































