‘पीईटी’ परीक्षा वर्षातून तीन वेळा घ्या! युवासेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एमफिल’ आणि ‘पीएच.डी.’ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पीईटी’ (प्री एण्ट्रक्स टेस्ट-पेट) ही परीक्षा द्यावी लागते, मात्र गेली काही वर्षे ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान तर होतेच, पण त्याचबरोबर संशोधनावर त्याचा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी पेट चाचणी वर्षातून किमान तीनदा तरी घेतली जावी अशी मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठातून वर्षाला चार ते पाच हजार मुले ‘एमफिल’ आणि ‘पीएच.डी.’साठी पेट प्रवेश परीक्षेला बसतात. ही परीक्षा वर्षातून एक ते दोन वेळाच होते, पण गेली काही वर्षे ही परीक्षा वर्षातून एकदाच होत आहे. परीक्षा पुन्हा देण्यासाठी दुसऱया वर्षाची वाट पाहावी लागते. यादरम्यान परीक्षेला नापास झालेली मुले निराशेमुळे पुन्हा परीक्षा देत नाहीत. त्यामुळे जर मुंबई विद्यापीठाने पेट प्रवेश परीक्षा वर्षातून चार महिन्यांच्या अंतराने तीनदा घेतली तर त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. विद्यार्थी एकदा नापास झाला तरी चार महिन्यांच्या अंतराने तो परीक्षा देऊन पास होऊ शकतो. अशाने विद्यार्थ्यांमधील संशोधक आणि संशोधन वृत्ती कायम जागी राहील. त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. त्यामुळे वर्षातून तीनदा पेट परीक्षा घ्यावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात, डॉ. धनराज कोहचाडे यांनी निवेदनामार्फत कुलसचिवांकडे केली आहे.

या वर्षीची पेट परीक्षा कधी होणार?
मुंबई विद्यापीठातर्फे घेतली जाणारी पेट प्रवेश परीक्षा 2019-2020 हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले तरी तिचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे ही परीक्षा वेळेवर घ्यावीच, पण त्याचबरोबर वर्षातून तीन वेळा पेट घ्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि संशोधक वाढून देशाच्या प्रगतीला चालना मिळेल, असे युवासेनेचे म्हणणे आहे.