कृषी विद्यापीठातील पीएच.डी. विद्यार्थ्यांना दोन वर्षांची थकीत शिष्यवृत्ती द्या, युवासेनेचे राज्यपालांना निवेदन

कृषी विद्यापीठातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी, सारथी, महाज्योती या शासकीय संस्थेकडून पीएच. डी. फेलोशीप दिली जाते. मात्र गेली दोन वर्षे ही शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक व संशोधनाशी संबधित अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांची थकीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन राज्यपाल देवव्रत आचार्य यांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश असून देशातील 65 ते 70 टक्के लोकांची उपजीविका शेतीवर आहे. शेती क्षेत्रात नियमित उत्पादन वाढीसाठी संशोधन होणे आवश्यक असून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023 ते 2025 पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलनही केले होते. शिष्यवृत्ती निधी इतर शासकीय योजनांमध्ये वळते केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून मागील दोन वर्षांची थकीत शिष्यवृत्ती द्यावी व त्यांना न्याय द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना उपनेत्या, सिनेट सदस्य शीतल शेठ- देवरुखकर, प्रदीप सावंत, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर आदी उपस्थित होते.