विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया खेळाडू विद्यार्थ्यांच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार यापुढे खेळाडूंना एक हजार रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येणार असून ही रक्कम थेट खेळाडूंच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याप्रकरणी युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या खेळ व शारीरिक शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा केला होता.
खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया अनेक विद्यार्थी खेळाडूंना विद्यापीठाकडून किमान सुविधा मिळत नाही. याप्रकरणी काही खेळाडू विद्यार्थ्यांनी राज्याचे मंत्री शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत युवासेना सिनेट सदस्यांनी खेळ व शारीरिक शिक्षण संचालकांना निवेदन देऊन विविध मागण्या केल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना मिळणारा दैनंदिन भत्ता 250 रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आला. हा भत्ता रोखीने अनियमितपणे देण्यात येत असे, परंतु आता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. त्याचप्रमाणे खेळाडू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे किट दिले जाणार असून स्पर्धेच्या ठिकाणी रेल्वे प्रवास आरक्षित तिकिटावर करण्यात येईल. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत विमानाने प्रवास करता येईल. नुकताच अमरावती येथे पश्चिम विभाग स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाचा कबड्डी संघ (मुले) रवाना झाला. याप्रसंगी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, संचालक डॉ. मोहन आमृले, प्रशिक्षक डॉ. यशवंत पाष्टे यांनी खेळाडूंना किट वाटप करून शुभेच्छा दिल्या.
अशी होणार संघाची निवड
विविध खेळाच्या संघाच्या निवड प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सर्व इच्छुक आणि पात्र खेळाडूंना संधी मिळावी यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार विभागात संघ करून त्यामधून मुख्य संघाची निवड केली जाणार आहे.































































