
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत असताना सरकारचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष असून जिल्हयाचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एक बैठक घेतली आहे, तेव्हापासून त्यांनी अमरावती जिल्ह्यात पाय ठेवलेला नाही, अशी टीका करीत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. पालकमंत्री शोधा आणि 50 खोके मिळवा या नाऱ्यासह राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एकदाच बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील कुठल्याही समस्यांची दाखल त्यांनी घेतली नाही. पालकमंत्री बेपत्ता झाले आहेत, असा आरोप युवा सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख सागर देशमुख आणि युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी केला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील पालकमंत्री कार्यालयावर धडक दिली. पोलिसांना चुकवून कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवले आहे. मात्र त्यांना अमरावती जिल्ह्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांच्या अशा कारभारामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास ठप्प पडला आहे. पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने प्रशासकीय अधिकारी निर्धास्त आहेत. सर्वसामान्यांची अनेक कामे खोळंबली आहेत, असा आरोप देखील युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.



























































