जगज्जेतेपदाचा विचार न करता खेळा! युवराज सिंगचा महिला संघाला सल्ला

परिस्थितीनुसार खेळा. अपेक्षांपेक्षा वर्तमानावर अधिक लक्ष ठेवा. आता इतिहास घडवण्याची नामी संधी आहे. फक्त पहिल्या दिवसापासूनच जगज्जेतेपदाचा विचार न करता स्वतःला झोकून द्या, असा सल्ला दिलाय युवराज सिंगने. आयसीसी महिला क्रिकेट विश्वकपच्या हिंदुस्थानातील रंगतदार मेजवानीस अवघे 50 दिवस शिल्लक असून आता महिला क्रिकेटलाही पुरुषांप्रमाणे पाठिंबा देण्याची वेळ आल्याचेही तो म्हणाला.

युवराज सिंगने आपल्या सल्ल्यारूपी भाषणात आपल्या घरच्या मैदानावर विश्वकप खेळण्याच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देताना क्रिकेटच्या प्रवाहात स्वतःला झोकून द्यावे, मग यश आपोआप आपल्या परिश्रमांना मार्ग शोधून देत असल्याचेही त्याने सांगितले.

50 षटकांचा वर्ल्ड कपच खरा वर्ल्ड कप आहे. तो हिंदुस्थानात होत आहे आणि सर्वांनी यासाठी अत्यंत उत्साहित व्हायला हवे. असे क्षण आयुष्यात वारंवार येत नाहीत. हा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. महिला संघाचेही जेतेपदाचे स्वप्न अनेकदा उद्ध्वस्त झालेय. आम्हीही तो काळ अनुभवला आहे. त्यामुळे पुढे काय होईल याचा विचार न करता, सध्याच्या क्षणाचा आनंद घेणे गरजेचे आहे. पूर्वी आपण मुलांना पाठिंबा देत होतो, आता मुलींचा वेळ आहे. घरच्या मैदानावर खेळताना येणारा अतिरिक्त दबावही युवराजने मान्य केला आणि खेळाडूंना ठोस सल्लाही दिला. युवराजच्या मते, ‘प्रेक्षक नेहमी चौकार-षटकारांची आतषबाजी किंवा विकेट धडाधड कोसळण्याची अपेक्षा करतात. पण विश्वकप जिंकायचा असेल तर तुम्हाला तुमची स्थिती आणि मनःस्थिती मजबूत ठेवावी लागेल. दबावाचे क्षण येतील, अपयशाचे क्षणही येतील. अशा वेळी अनुभव, आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास टिकवणे सर्वात महत्त्वाचे आहे.