जिद्द सोडू नका, निश्चितच गरुडझेप घ्याल ; आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

काहीतरी मोठं करून दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगा. जिद्द ठेवा. तुमच्या जिद्दीवरच तुम्ही गरुडझेप घ्याल, एखाद्या कंपनीचे मॅनेजर व्हाल, सीईओ व्हाल. तुमच्यातला एखादा जिद्दीच्या जोरावर देशाचा पंतप्रधानही होईल. फक्त जिद्द सोडू नका’ असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज तरुणांना केले. कितीही मोठे झालात तरी विनम्रतेचा स्थायिभाव सोडू नका, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.

राज्याच्या उद्योग विभागातर्फे उरळी देवाची येथील सोनाई लॉन्स येथे आयोजित केलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळावा’च्या उद्घाटनप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. अनेक तरुणांना नोकऱया हव्यात, तर अनेकांना स्वयंरोजगार उभारायचे आहेत. मात्र तुम्ही कोणतेही काम आवडीने करा, काहीतरी मोठे करून दाखविण्याचे स्वप्न उरी बाळगा. मी तुमच्या सोबतच आहे, असे ते म्हणाले. आपण जे शिकतो ते आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकते की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील उद्योग खाते आणि शिक्षण खात्याने एकत्रितरीत्या एज्युकेशन रिफार्म करता येईल का हे पाहायला हवे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. मराठी माणसाला रोजगार देण्यासाठी शिवसेनेने केलेल्या कार्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सीआयआयचे आशीष केशरवानी आदी यावेळी उपस्थित होते. पहिल्यांदाच राज्य शासनाच्या माध्यमातून असा मेळावा होत असून जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणीच नियुक्तीपत्र दिले जाणार आहे, असे विजय शिवतारे यावेळी म्हणाले.

राज्यभरात रोजगार मेळावे घेणार – सुभाष देसाई
राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच राज्यभरात रोजगार मेळावे घेण्यात येणार असून त्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातून होत आहे, असे याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले. पुण्यातील मेळाव्यासाठी एका आठवडय़ात ८ हजार ८०० उमेदवारांनी ऑनलाइन तर तीन ते चार हजार उमेदवारांनी ऑफलाइन नोंदणी केली आहे. ९० ते १०० कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत. मात्र शेवटचा तरुण मुलाखत देऊन जात नाही तोपर्यंत हा मेळावा सुरू राहील. सर्वांना रोजगार मिळेपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील, असे देसाई यांनी स्पष्ट केले.