
हिंदुस्थानच्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप व वन डे वर्ल्ड कप विश्वविजेतेपदात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवराज सिंगला आणखी एक वर्ल्ड कप देशासाठी खेळावयाचा होता. मात्र त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही. याला कारणीभूत संघव्यवस्थापन असल्याचे परखड मत दस्तुरखुद्द युवराज सिंग याने याप्रसंगी व्यक्त केले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, 2011 सालानंतर आणखी एक वर्ल्ड कप निश्चितच खेळू शकलो असतो. पण संघव्यवस्थापन आणि आजूबाजूच्या व्यक्तींमुळे मी ऑस्ट्रेलियातील 2015च्या वर्ल्ड कपपासून दूर राहिलो, अशी खंत पुढे त्याने व्यक्त केली.
‘सामनावीर’ ठरल्यानंतरही बाहेर बसवले
2017 सालातील चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर झालेल्या 8 ते 9 सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये मी ‘सामनावीर’ ठरलो. मला दुखापत झाली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज राहायला सांगितले, पण मला संघात संधी दिली नाही. सामनावीराचे बक्षीस मिळवल्यानंतरही बाहेर बसवण्यात आले, असे निराश उद्गार युवराज सिंगने यावेळी काढले.
वयाच्या 36 व्या वर्षी ‘योयो टेस्ट’ पास झालो, पण…
वयाच्या 36 व्या वर्षी संघव्यवस्थापनाने मला ‘योयो टेस्ट’साठी पाठवले. त्यामध्येही मी पास झालो. मात्र यानंतर मला स्थानिक क्रिकेट स्पर्धामध्ये खेळायला सांगण्यात आले. ‘योयो टेस्ट’मध्ये मी नापास होईन असे त्यांना वाटत होते, पण मी पास झालो आणि त्यांचा समज चुकीचा ठरवला असे युवराज पुढे म्हणाला.
सेहवाग, झहीर आणि माझी अवस्था सारखीच
15 ते 16 वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला सन्मानजनक वागणूक देण्यात आली नाही. माझ्यासोबतच नव्हे, तर वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांच्यासोबतही तसाच काहीसा प्रकार घडला. अनुभवी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते. प्रत्यक्षात तसे काही घडतच नाही, असे युवराज सिंगला वाटते.
























































