वैभव मांगले सांगतायत, ‘आपलं नमान जगात येक नंबर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

खेडापासूनजी सुरूवात झाली ती अगदी राजापूर पवंत आपली सगली परंपरा हाय कोकनाची…ताऽऽऽ आपली बोली भाषा हाय संगमेश्वरी ती तुमा सगल्याना ठाव हाय…आपल्याकडं मेन उत्सव म्हनजे शिमगा, गणपती काय समजलाव…आणि जाखडी नमान हवचं हवं..जाखडी, नमनाशिवाय काम चालत नाय…काय समजलाव. आपली जी परंपरा जपलीय ती एकदम भारीय…आपलं नमान तर जगात येक नंबर..गौळणी येतात..मावशी येते, किसना येतो सगल झो एक नंबर काम काय समजलाव अशा शब्दात नमन, जाखडी या लोककलांविषयी अभिनेता वैभव मांगले यांनी संगमेश्वरी बोली भाषेत गौरवोद्गार काढले. कोकणातील लाल मातीतील ह्या लोककला आजही लोकप्रिय आहेत.

मुंबय-पुन्यातचं नव्हं कोकनात पन घडतय, वैभव मांगले यांची संगमेश्वरी बोलीत नवी मालिका

नाचणे गावात गुरूमळीत आमी एक शिरीयल करताव हाय त्याचं नाव हाय एक गाव भुताचा..सगलं इथलाच टॅलेंट घेतलाव मुंबयसन कोन नाय आलेला हाय. मी एकटाच हाय ता पन लॉकडाऊनच्या आधी आलेला हाय काय समजलाव…इथल्या टॅलेंटला घेऊन आमी शिध्द करून दाखिवलेला हाय की मुंबई-पुन्यातच हे सगलं घडत असं नाय तर कोकनात घडतयं. तेवढेच टेक्निकली साउंड असलेली लोकं हायत काय समजलाव..अशा संगमेश्वरी थाटात अभिनेता वैभव मांगले यांनी दैनिक सामनाला प्रतिक्रीया दिलीय.

एक गाव भुताचा ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होत आहे. या मालिकेचे चित्रिकरण रत्नागिरीतील नाचणे गावात होत आहे. संगमेश्वरी बोलीतील या मालिकेत सर्व कलाकार,तंत्र। रत्नागिरीतील आहेत. रत्नागिरीच्या हौशी रंगमंचावर अभिनय करत व्यवसायिक नाटक, चित्रपट आणि मालिकेत चमकलेले वैभव मांगले यांनी रत्नागिरीतील कलाकारांना यामालिकेच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळवून दिले आहे.अभिनेते वैभव मांगले पुढे म्हणाले की या शिरीयलमंधी माझ्यासंगाती प्रफुल्ल घाग, अप्पा रणभिसे, सुनील बेंडखळे, सचिन काळे, संतोष सावंत असे मॉप कलाकार हायतं कोकनातला टॅलेंट आमी पुढं आणलेला हाय अस मांगलेनी बोली भाषेत सांगितले.