सायबर गुन्ह्याविरोधात कुठूनही तक्रार देता येणार

सामना ऑनलाईन । मुंबई

महिला व बालकांना त्यांच्यावर होणाऱ्या ऑनलाइन लैंगिक अत्याचाराच्या देशाच्या गुन्ह्याविरोधात कुठल्याही कानाकोपऱ्यातून आता थेट ऑनलाइन तक्रार देता येणार आहे. सर्रास होऊ लागलेल्या सायबर गुह्यांची गंभीर दखल घेत अशा गुह्यातील पीडित महिला व बालकांना त्याच्यावरील अत्याचाराची तत्काळ तक्रार देता यावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे वेब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमुळे पीडितांना तक्रार देऊन झटपट न्याय मिळविणे अधिक सोयीचे होणार आहे.

महिला व बालकांवरील सायबर गुह्यांचे प्रमाण झपाटय़ाने वाढू लागले आहेत. याबाबत ‘प्रज्वला’ या एनजीओने सर्वोच्च न्यायालयात खटला भरला होता. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने पीडित महिला अथवा बालकांना कुठूनही तत्काळ तक्रार देता यावी अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने अशा पीडितांसाठी  www.cyberpolice.gov.in हे वेब पोर्टल सुरू केले आहे. दिल्लीस्थित नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोला (एनसीआरबी) या पोर्टलचे प्रमुख नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले आहे. सध्या प्राथमिक अवस्थेत असलेले हे पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

48 तासांत तक्रारीचा स्टेटस कळणार

देशातून कुठूनही पीडितांना या पोर्टलद्वारे आपल्यावर होणाऱ्या सायबर गुन्ह्याविरोधात ऑनलाइन तक्रार देता येणार आहे. त्यानंतर ही तक्रार खरी असेल आणि त्यानुसार गुन्हा दाखल करता येणार असेल किंवा दखल घेण्यासारखी तक्रार नसेल तर तसे संबंधितांना 48 तासांच्या आत कळविले जाणार आहे.

– या तक्रारींची दखल

तरुणी, महिला किंवा बालकांचे अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप व्हायरल केली जाते, अश्लील वक्तव्य केले जाते, रेप, गँगरेपसारख्या गुह्यांचे फोटो पसरवले जातात. अशा गुह्यांविरोधात या पोर्टलवर तक्रार देता येणार आहे.

महिला, लहान मुलांवर होणाऱ्या ऑनलाइन गुन्ह्याविरोधात झटपट तक्रार देता यावी यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात येत आहे. महिला व लहान मुलांवरील सायबर गुह्यांचा झटपट तपास होऊन गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी हे पोर्टल महत्त्वाचे काम करणार आहे. देशातून कुठूनही पीडितांना त्यांची तक्रार देता येणार असल्याने हे पोर्टल फारच उपयुक्त ठरणार आहे.
-बालसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक (महाराष्ट्र सायबर)

पोर्टलचे काम असे चालणार

-प्रत्येक राज्यात सायबर विभागाचे एक नोडल ऑफिस असेल. एनसीआरबी या दिल्लीतील मुख्य नोडल ऑफिसकडून ऑनलाइन आलेली तक्रार पीडित ज्या राज्याचे असतील त्या नोडल ऑफिसकडे पाठविली जाईल.

-मग राज्याच्या नोडल ऑफिसकडून पीडित ज्या जिह्यातील असेल त्या जिह्याच्या प्रमुख पोलीस कार्यालयात तक्रार पाठविण्यात येईल.

-त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे तक्रार दिली जाईल. मग त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी संबंधित पीडितांना बोलावून त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून तपास करतील.

-ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने यात झटपट काम होणार असून तक्रारदार व पोलिसांचा वेळ वाचणार आहे.