
सामना प्रतिनिधी, नांदेड
आजपासून ते 21 मेपर्यंत शून्य सावली चा अनुभव सर्वांना घेता येणार असल्याची माहिती खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सामनाशी बोलताना दिली. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिना असल्याने उन्हाळा चालू आहे त्यामुळे ही घटना पाहता येणार आहे . 21 जून नंतर दक्षिनायन सुरु झाल्यावर परत एकदा जुलै महिन्यात आपल्या डोक्यावर सूर्य येतो परंतु त्या वेळेस आपल्याकडे पावसाला सुरु असल्याने हि घटना पाहता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
या वर्षी 12 मे पासून 21 मे ही खगोलीय घटना मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरामधून अनुभवता येणार आहे. आठ मे रोजी कोकणातील सिंधूदुर्ग जिल्ह्यापासून कोकणात ह्याला सुरुवात होणार असून, पश्चिम महाराष्ट्रात 10 मे रोजी, 12 मे रोजी मराठवाड्यात, 18 मे रोजी विदर्भात तर 20 मे पासून उत्तर महाराष्ट्रात याची अनुभूती सुरु होणार आहे, असेही औंधकर यांनी सांगितले.
मराठवाड्यातील महत्वाच्या शहरातील तारखा खालील प्रमाणे
12 मे – उमरगा
13 मे – धाराशिव,बााा निलंगा, औसा
14 मे – लातूर, उदगीर, कळंब, भूम
15 मे – अंबाजोगाई , केज, पाटोदा, कंधार
16 मे – परभणी, पुर्णा, नांदेड, बीड, माजलगाव
17 मे – पैठण, मानवत, सेलू, हदगाव
18 मे- गंगापूर, अंबड, जिंतुर, किनवट
19 मे – संभाजीनगर,जालना, हिंगोली
20 मे – फुलंब्री
21 मे – सिल्लोड , कन्नड.
संभाजीनगर येथे खास व्यवस्था
दिनांक 19 मे 2019 रविवार रोजी सदरील घटना औरंगाबाद येथून अनुभवयास मिळणार आहे. यासाठी महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रातर्फे ही खगोलीय घटना पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सदरील घटना पाहण्यासाठी सकाळी 10:30 वाजता केंद्रावर यावे लागेल व साधारण दुपारी 12:15 ते 12:30 दरम्यान आपल्याला शून्य सावली अनुभवयास मिळणार आहे. या वेळेस ही शून्य सावली का अनुभवयास मिळते या साठी विशेष मार्गदर्शन हेलिओस मीटरद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.




























































