उच्च रक्तदाबाच्या त्रासावर इंजेक्शन आले, रोज औषधे खाण्याची कटकट संपणार

जगभरात 1.28 अब्जाहून अधिक प्रौढांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. या रोगाशी लढण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहेत. अमेरिका कंपनीने एक नवीन औषध विकसित केले आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे औषध असून ते इंजेक्शनवाटे देण्यात येते.  या इंजेक्शनमुळे सहा महिन्यांपर्यंत रक्तदाब नियंत्रणात राहातो असा दावा औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने केला आहे.  हे औषध लवकरच बाजारात येणार आहे.

जिलेबेसिरान असं या औषधाचे नाव असून या औषधाच्या एका डोसमुळे सहा महिन्यांपर्यंत उच्च रक्तदाब नियंत्रणात राहातो.  हे औषध अमेरिकन हार्ट असोसिएशन सायंटिफिक सेशन 2023 मध्ये सादर करण्यात आले होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या जगभरातील लाखो रुग्णांसाठी हे औषध उपयुक्त ठरू शकेल. या औषधामुळे रोज गोळ्या खाण्याची कटकटही संपेल. हृदयविकारतज्ज्ञ डॉ. चेंग हान चेन यांनी सांगितले की, अनेक लोक डॉक्टरांनी दिलेली औषधे घेत नाही ज्यामुळे त्यांना अधिक त्रास होतो, अशा लोकांसाठीही हे औषध उपयोगी ठरेल.

संशोधकांनी उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या 394 लोकांवर या औषधाची चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान हे औषध घेतलेल्यांचा सिस्टोलिक रक्तदाब 135 ते 160 च्या दरम्यान होता. जेव्हा रक्त हृदयाच्या संपर्कात येते तेव्हा रक्तवाहिन्यांवर किती दबाव पडतो ते सांगणारे प्रमाण म्हणजे सिस्टोलिक रक्तदाब आहे. हे औषध घेतलेल्या लोकांमध्ये सरासरी सिस्टोलिक रक्तदाब142 एमए एचजी. परीक्षणासाठी निवडलेल्या लोकांना दर 6 महिन्याला 150 मिग्रॅ ते 600 एमजी औषध दिले जायचे. 6 महिन्यानंतर केलेल्या पाहणीत या सगळ्यांचा उच्च रक्तदाब हा नियंत्रणात असल्याचे दिसून आले होते.

स्टॅनफोर्ड मेडिसिन येथील हायपरटेन्शन सेंटरचे संचालक डॉ. विवेक भल्ला म्हणाले की, या इंजेक्शनचा प्रभाव 3 ते 6 महिन्यापर्यंत राहतो. हे इंजेक्शन सिस्टोलिक ब्लड प्रेशर 20% कमी करत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. हे औषध 3 किंवा 6 महिन्यांतून एकदा घेणं आवश्यक आहे.