जम्मू कश्मीर मधील जिल्हा परिषदांना महाराष्ट्रातल्या विकसित गावाची भुरळ; हिवरे बाजाराला दिली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hiware-bazar

लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्थेला जम्मू कश्मीरमध्ये बळकटी देण्यासंदर्भात जम्मू कश्मीर येथील जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी हिवरे बाजारला भेट दिली. भेटीदरम्यान हिवरे बाजारने कशा पद्धतीने लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्थेचा उपयोग करून गाव घडविले याचा अभ्यास करण्यासाठी या भेटीचे आयोजन केले होते. याच धर्तीवर जम्मू कश्मीर मधील जिल्ह्यात तेथील भौगोलिक परिस्थिती व समस्यांचा विचार करून लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्था बळकट करणे व गावे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सक्षम करणे हा या भेटी मागचा हेतू होता.

काही काळापूर्वी उजाड आणि ओसाड हिवरे बाजार आज निसर्गरम्य आणि जलसमृध्द झाले आहे. दुष्काळाकडून समृद्धिकडे झालेला हा प्रवास पाहून आम्ही जम्मू कश्मीरचे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी थक्क झाले. इथे आल्यावर आम्हाला आमच्या भूमीची जम्मू कश्मीरची आठवण झाली.खरोखर तुम्ही निसर्ग आणि जलगंगा हिवरे बाजारच्या भूमीत निर्माण केली आहे. हिवरे बाजारात जलसमृद्धी, वृक्षसमृद्धी, कृषिसमृद्धि आहे.

कश्मीरमधील शोपियन या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओलामीर मुस्तार यांनी हिवरे बाजार मधील विकास पाहून आनंद व्यक्त केला. शोपियन जिल्हा हा पुलवामा पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी सर्वांचे स्वागत केले व हिवरे बाजारच्या विविध कामांची माहिती दिली. त्यावेळी शिष्टमंडळाने सांगितले पवार साहेब तुमचे विचार ऐकून आणि तुमचे त्यागमय जीवनाचा आम्हाला अभियान वाटतो. जम्मू कश्मीरमध्ये आदर्श व स्वावलंबी खेडी उभारण्याचा विचार असल्याचा अभिप्राय शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी व्यक्त केला.