
कोरोना विषाणुच्या महामारीमुळे अनेक क्षेत्राला फटका बसला असून यातून आता ऑनलाइन फूड डिलव्हिरी करणाऱ्या कंपन्यांची ही सुटका नाही. या संकटात आता ऑनलाईन फूड डिलिव्हरीत अग्रेसर अशा झोमॅटोने आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झोमॅटोने हा निर्णय जाहीर केला असून जूनपासून 50 टक्के पगार कपात देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही पगार कपात पुढील सहा महिन्यांसाठी असणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.
कोरोना विषाणुच्या वाढता प्रादुर्भावामुळे हिंदुस्थानात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जवळपास सर्वच जण घरात बसून आहे. परिणामी कोव्हिड – 19 मुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. यामुळे अनेक व्यवसाय सध्या बंद होण्याच्याही मार्गावर आहेत. याचा फटका झोमॅटोसारख्या अग्रेसर कंपनीलाही बसला आहे. शुक्रवारी या संदर्भात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट केले की, ‘आम्हाला आमच्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे हीच आमची इच्छा आहे. मात्र भविष्यात आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांसाठी काम उपलब्ध करून देणे जमणार नाही’ टीम लीडर्सकडून येत्या 24 तासात ज्यांची नोकरी गेली आहे त्यांना झूम कॉल करून सांगण्यात येणार आहे आणि ज्यांची नोकरी टिकली आहे त्यांनाही त्या स्वरूपाचा मेल एचआरकडून येईल असंही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.



























































