नगर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोमांस विक्रीवर कारवाई

नगर शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध कत्तल आणि गोमांस विक्रीवर कोतवाली पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह आरोपीना ताब्यात घेत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गोमांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुप्त बातमीदाराकडून नगर शहरातील झेंडीगेट येथील आर आर बेकरीसमोर बोळीत काही गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याच्या मांसाची एका शेडमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती.त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सदरील ठिकाणी धाड टाकली असता मांस विक्री करणाऱ्या इसमाने पोलीसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास पकडले. त्या ठिकाणी कत्तल केलेले गोमांस आढळून आले. फिरोज समशेर शेख (39, रा.मूळा बाब जवळ कोठला घास गल्ली, नगर)असे या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून 80 हजार रु. किमतीचे गोमांसाचे मोठे तुकडे व सतूर ताब्यात घेण्यात आला आहे.

तसेच काल दि.8 रोजी सकाळी कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून शहरातील पंचपीर चावडी येथे चाफे फरसाण दुकानाच्या मागील बोळीत गोवंशिय जणावरांच्या मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने सदरील ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्याठिकाणी अदनान फारूक कुरेशी (22, रा.जुने नगर झेंडीगेट, नगर) याला मांसासह जागीच ताब्यात घेण्यात आले.त्याच्याजवळ 20 हजार रु. किमतीचे गोमांस आढळून आले. या दोन्हीही आरोपीवर भा.द.वि. कलम 269, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (अ), (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तणवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने केली आहे.