मागच्या दारातून आले म्हणून मोदींनी मराठा समाजाला हिणवले! मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळेच ‘मागच्या दारातून आले’ असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला हिणवले असल्याचा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला. मुस्लिमांचाही त्यांनी एका अर्थाने अपमानच केला. एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणार्‍या धनगरबांधवांचे आता काय होणार? असा प्रश्नही जरांगे यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणासाठी रान उठवणारे मनोज जरांगे पाटील हे कळमनुरी तालुक्यात दांडेगाव येथे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड येथे जाहीर सभेत केलेल्या भाषणाचा समाचार घेतला. मुख्यमंत्री प्रचारात काहीही सांगत असले तरी त्यांनी दिलेले १० टक्के आरक्षण काहीही उपयोगाचे नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा झाली असून, आरक्षणावरून धडधडीत खोटे बोलणारांविरोधात त्यांच्या मनात प्रचंड संताप आहे. राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे हे दहा टक्के आरक्षण टिकणारच नाही, असे जरांगे म्हणाले.

धनगर आरक्षणातही काडी टाकली
आपण जिवंत असेपर्यंत एससी, एसटी तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आरक्षणातही काडी टाकली आहे. आपण भाजपला एवढे मोठे केले आता तेच आपल्या आरक्षणाला चूड लावत असल्याची संतप्त भावना धनगरबांधवांमध्ये निर्माण झाली आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

फडणवीसांनी फसवणूक केली

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असा शब्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. परंतु त्यांनी आपला शब्द पाळला नाही. सातत्याने मागणी करूनही एकाही आंदोलकावरील गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. फडणवीसांनी मराठा समाजाची घोर फसवणूकच केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

मोदी गाद्या, गोधड्या घेऊनच आलेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गाद्या, गोधड्या सोबतच घेऊन आलेत. बाडबिस्तरा घेऊन त्यांनी इकडेच मुक्काम ठोकला आहे. ही मराठा समाजाची भीती आहे. हाच मराठा समाजाचा विजय असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले.

प्रकृती बिघडली, जरांगे रुग्णालयात
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सततच्या दौर्‍यांमुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला असून, त्यांना श्वसनाचा संसर्गही झाला आहे. सध्या जरांगे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. विनोद चावरे यांनी सांगितले.