लेख – नक्षली कारवायांवर नियंत्रण

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन , [email protected]

छत्तीसगडमध्ये सशस्त्र माओवाद्यांचे समर्थक कमी होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे आक्रमक धोरण, सुरक्षा दलांना दिलेली मुभा यासोबतच वाढती संचार साधने यामुळे माओवादी काही अंशी माघारल्याचे दिसत आहे. परंतु पोलीस आणि अर्ध सैनिक दलांना एकत्र आक्रमक कारवाई करून अबुझमाडच्या जंगलात घुसून तिथे असलेले माओवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प आणि तळ उद्ध्वस्त करावे लागतील, तरच माओवादाचे कंबरडे मोडेल व इथला माओवाद नियंत्रित होऊ शकेल.

गेल्या काही वर्षांपासून माओवादी हिंसाचारात ठार होणाऱयांची संख्या कमी कमी होत होती, परंतु 2024 मध्ये या हिंसाचारामध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी सुरक्षा दलांनी केलेल्या आक्रमक कारवायांमध्ये एप्रिल आणि मेमध्ये मारल्या गेलेल्या माओवाद्यांची संख्या एकदम वाढली आहे आणि त्याकरिता सुरक्षा दलांचे, खास तर छत्तीसगड पोलिसांचे कौतुकच करायला पाहिजे.

आज मध्य भारतामध्ये शस्त्रधारी माओवाद्यांची संख्या एक ते दीड हजार असावी. त्यांच्याविरुद्ध विविध अर्धसैनिक दले म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा बल, सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसही तैनात आहेत. याशिवाय चारी राज्यांतील आर्मड पोलीससुद्धा त्यांच्याविरुद्ध कार्यरत आहेत. यांची संख्या अडीच लाख ते तीन लाखांमध्ये असावी. मात्र ही अर्धसैनिक दले आणि पोलीस फारशा आक्रमक कारवाया करत नव्हते. त्यामुळे माओवादाचा प्रभाव कमी होण्याऐवजी वाढत होता. मात्र आता सुरू झालेल्या आक्रमक सुरक्षा कारवायांमुळे माओवाद्यांना नक्कीच धक्का बसला आहे.

बुलेट विरुद्ध बॅलेटची लढाई

देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओप्रभावित भागामध्ये सुरक्षा दलांनी आक्रमक कारवाया करीत माओवाद्यांच्या हिंसक कारवाया कमी करण्यात यश मिळवले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यातील गडचिरोली-चिमूर लोकसभेची निवडणूक 72 टक्के मतदानासह बंदुकीची गोळी फायर न करता आणि माओवाद्यांच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या धमक्यांना दाद न देता यशस्वीपणे पार पडली. याच काळात छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन मोठय़ा चकमकींमध्ये 39 माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस आणि सशस्त्र दलांना यश आले. पहिल्या घटनेत 16-17 एप्रिलला कांकेर जिह्यात ‘सीआरपीएफ’ आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 29 माओवाद्यांचा मृत्यू झाला, तर 29 एप्रिलच्या रात्री अबुझमाडमध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोलीतील माओ नेता जोगन्नासह 10 माओवादी ठार झाले.

या दोन मोठय़ा कारवायांसह गेल्या तीन महिन्यांत सुरक्षा दलांनी 100 माओवाद्यांना ठार मारले. चकमकीत इतक्या मोठय़ा संख्येने माओवादी ठार होणे हे सुरक्षा दलाचे मोठे यश आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर उत्तरेकडील कांकेर आणि पूर्वेकडील नारायणपूरपासून अबुझमाडपर्यंतच्या प्रवेशद्वारावर नव्या पोलीस छावण्या उभारण्यात आल्या. पोलिसांनी इंद्रावती-गोदावरीची उपनदी असलेली कोत्री नदी ओलांडून अबुझमाडमध्ये बेस कॅम्प उभारला. या कॅम्पमुळेच अलीकडच्या दोन्ही कारवाया यशस्वी झाल्या आहेत.

सुरक्षित आश्रयस्थान

दंडकारण्यातील अबुझमाड हा भाग मध्य भारतात येतो. घनदाट जंगल, टेकडय़ांनी वेढलेला हा प्रदेश दक्षिण छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात सुमारे 4 हजार चौरस किमी क्षेत्रफळामध्ये आहे. कांकेरच्या दक्षिणेस नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा जिह्यांचा भाग या जंगलाने व्यापला आहे. राहण्यासाठी अवघड भूभाग, रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा नसणे आणि माओवाद्यांच्या कारवायांमुळे हा भाग असुरक्षित आहे. सुरक्षा दलांना चकवा देण्यासाठी माओवाद्यांकडून या जंगलाचा वापर केला जातो. विजापूर जिह्यातील इंद्रावती नॅशनल पार्कच्या काही भागांसह महाराष्ट्र (पश्चिम), आंध्र प्रदेश (दक्षिण), तेलंगणा आणि ओडिशा (पूर्व) या राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी माओवादी याच जंगलाचा वापर करतात. हे जंगल आणि दुर्गम प्रदेश त्यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरले आहे.

अबुझमाडचे जंगल म्हणजे माओवाद्यांची राजधानी आहे. या जंगल परिसरात 237 गावे आहेत. मात्र इथे 2017 सालापर्यंत कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारी सुविधा पोहोचली नव्हती, अशा परिसरात आता सुरक्षा दलांनी माओवाद्यांना मारले, हे नोंद केले पाहिजे.

पोलिसांनी सशस्त्र मोहिमांबरोबरच सोशल पोलिसिंग प्रभावीपणे राबवली आहे. जनजागरण मेळावे घेणे, नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवून घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिह्यात झालेली विकासकामे आणि माओवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. परिणामी तरुणांचे माओवादाकडे आकर्षित होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

वाढत्या शिक्षणाच्या संधी आणि पोलिसांमार्फत होणारी विकासाची कामे, रोजगार निर्मिती होत आहे. एकीकडे पोलिसांच्या कारवायांमुळे माओवाद्यांचा प्रभाव कमी होत असताना दुसरीकडे माओवादी कारवायांसाठी होणारी भरतीही जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे गडचिरोलीतील सशस्त्र माओवाद कमी झाला आहे. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गांचा विकास, मोबाईल-इंटरनेटचा विस्तार, आश्रमशाळांना येऊ लागलेली सुस्थिती, गोंडवाना विद्यापीठामुळे महाविद्यालयांच्या संख्येत होणारी वाढ, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलींमधून विकसित भागाचा अनुभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न, ही दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील लोकांचे माओवाद्यांना असलेले पाठबळ कमी करणारी शस्त्रs ठरत आहेत. पोलिसांनी लोकांचा विश्वास प्राप्त केल्यामुळे पोलीस खबऱयांची संख्या वाढत आहे. सरकार, राजकीय पक्ष, सुरक्षा दले, सामाजिक संस्था यांना अजून खूप काम करावे लागेल.