>> विनायक
आपल्या या सदराचं नाव ‘विज्ञान-रंजन’ असं आहे. वैज्ञानिक गोष्टींची केवळ रुक्ष तांत्रिक माहिती न घेता त्यामागची गंमतही समजली तर ते रंजक होतं. अर्थात प्रत्येक वैज्ञानिक संशोधनाबाबत ते शक्य नाही, पण पम्बनचा उघडणारा पूल किंवा ट्रान्ससायबेरियन रेल्वेची गोष्ट विज्ञानावरच आधारित असली तरी त्यातील रंजकता सामान्य माणसांच्या मनात त्याविषयीचं कुतूहल जागं करू शकली तरी त्यातून त्याविषयीचा अधिक पिंवा विशेष अभ्यास करण्याची इच्छा काही जणांना, विशेषतः तरुण वर्गाला होऊ शकते. या लेखनामागचा उद्देश हा एवढाच आहे. म्हणून अधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न असतो.
गेल्या 8 तारखेला अमेरिकेतून जे 4 मिनिटं 28 सेपंदांचं खग्रास सूर्यग्रहण दिसलं ते आपल्याकडे 9 एप्रिलच्या आरंभी 12 वाजून 12 मिनिटांनी, डॅलस येथे तर 1 वाजून 5 मिनिटांनी आणखी उत्तरेला दिसलं. मेक्सिकोपासून म्हणजे दक्षिण-पश्चिम पिंवा नैýत्य भागातून सुरू झालेला ग्रहणपट्टा संपूर्ण अमेरिका देश म्हणजे ‘यूएस’ पार करून अॅटलॅन्टिक समुद्र ओलांडून पार युरोपात गेला होता. त्या संपूर्ण पट्टय़ावर ठिकठिकाणी मिळून जगभरातले सुमारे 35 लाख लोक हा अवकाशी आनंद सोहळा पाहायला जमले होते. मात्र या पट्टय़ात बऱयाच ठिकाणी आकाश ढगाळ आणि हवा वादळी असल्याने अनेकांची इकडून तिकडे पळापळ चालली होती. त्यात आमच्या ‘खगोल मंडळा’चेही अनेक सभासद होते. त्यांचे विविध ठिकाणांहून पह्न येत होते. त्यामुळे मुंबई निद्रिस्त झालेली असताना आमच्यासारखे जे जागे होते, त्यांना ‘नासा’च्या साइटवर अमेरिकेतील विविध ठिकाणची ‘टोटॅलिटी’ पाहण्याचा आनंद घेता आला. यामागे विज्ञान तर आहेच, पण मनोरंजनही होतं.
कितीतरी वैज्ञानिक, परंतु मानवनिर्मित गोष्टी आपली मती गुंग करणाऱया असतात, पण काही नैसर्गिक घटना आपण घडवत नसलो तरी त्यामागचं विज्ञान समजलं तर त्या पाहताना जास्त बरं वाटतं. अवकाशी विज्ञान रंजनात साऱया विश्वाचाच अभ्यास येतो. त्यात अवकाशयानांच्या पराक्रम-कथा असतातच, परंतु नैसर्गिक योगायोगाने (कॉस्मिक को-इन्सिडन्स) घटनाही अचंबित करतात. एकेकाळी त्यामागचं ‘रहस्य’ ठाऊक नसल्याने आणि त्यांची भीती वाटल्याने त्याविषयी गैरसमज होणं साहजिक होतं, परंतु अभ्यासकांनी घाबरून चालत नाही. त्यामागचा कार्यकारणभाव शोधावा लागतो. ते कार्य आपल्या देशातील आणि जगातील अनेक अभ्यासकांनी प्राचीन काळापासून केलं. तत्कालीन संसाधनांच्या मर्यादा लक्षात घेता तेही महत्त्वपूर्णच होतं. कृत्रिम संसाधनांची निर्मितीसुद्धा संशोधक वृत्तीतून आली आणि त्यातून त्याला जी गती प्राप्त झाली ती अक्षरशः अवकाशाला भिडली. पृथ्वीवरून खग्रास सूर्यग्रहण पाहणं ही सामान्यांसाठी सुवर्णसंधीच, पण उत्साही संशोधक ग्रहणपट्टय़ातील चंद्राची पृथ्वीवरची सावली ‘चेस’ करत वेगाने सतत टोटॅलिटी पाहत उडू लागले. असा पहिला प्रयोग 1923 मध्ये झाला. त्या वेळी ‘यूएस’च्या (अमेरिका) नौदलातील वैमानिकांनी 16 छोटय़ा विमानांमधून 10 सप्टेंबरचं ते खग्रास सूर्यग्रहण आकाशातून पाहून पृथ्वीवरचा त्याचा पट्टा नेमका कसा आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र त्या ग्रहणाचा विमानातून काढलेला पह्टो नाही. यामध्ये अल्बर्ट स्टीव्हन नावाचे जे पायलट होते त्यांना ‘फादर ऑफ एअरबोर्न अॅस्ट्रॉनॉमी’ असं म्हटलं जातं. (याचा अर्थ हवेतून खगोलीय घटनांचा वेध घेणं.)
1925 मध्ये अमेरिकेच्याच नेव्हल ऑब्झर्वेटरीने एडविन पोलॉक यांच्या नेतृत्वाखाली दोन टेलिस्कोपिक कॅमेरे घेऊन 24 जानेवारीच्या खग्रास सूर्यग्रहणाचा ‘लॉस एंजेलिस ते न्यूर्याक’ असा पाठलाग केला. नंतर 1930 तसंच 1932 मध्येही असे प्रयोग झाले. यालाच ‘चेसिंग द एक्लिप्स’ म्हणतात. कॅनडामधून त्यांच्या हवाई दलाच्या वैमानिकांनी 9 जुलै 1945 चं खग्रास सूर्यग्रहण बराच वेळ त्यांच्या उडत्या विमानातील स्वयंचलित पॅमेऱयाने टिपलं. 8 मे 1948च्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तर नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीने ग्रहण-पाठलागाची विशेष व्यवस्था करून उत्तम पह्टो मिळवले. अशा प्रकारे आकाशातून खग्रास सूर्यग्रहणाची पह्टोग्राफी करणाऱयांना ‘अम्ब्राफिले’ असं म्हणतात. ‘अम्ब्रा’ म्हणजे सावली. खग्रास सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्या बरोबर मधोमध, सरळ रेषेत आलेल्या चंद्राची सावली पृथ्वीवर त्याच भागातून वेगाने सरकते, जिथून सूर्य खग्रास स्थितीत दिसणार असतो. ‘अम्ब्राफिले’ म्हणजे ‘शॅडोलव्हर’ किंवा (चंद्राच्या) सावलीचा ध्यास घेणारा. ते खग्रास सूर्यग्रहण काळातच शक्य असतं. त्या वेळी विमानाची गती ताशी 740 किलोमीटर असते. (25 फेब्रुवारी 1952 च्या ‘ग्रहण पाठलागा’च्या तयारीचा पह्टो नेटवरून घेतला आहे.)
याचा फायदा ग्रहणकाळात हवा ढगाळ असेल तरीही खग्रास सूर्यग्रहणाचे सारे मनोहारी विभ्रम टिपण्यासाठी होतो. 8 एप्रिलच्या ग्रहणाच्या वेळी आकाशाचा ‘निरभ्र’ तुकडा शोधून ग्रहण पाहताना अमेरिकेत लाखो लोकांची ग्रहणपट्टय़ावर धावपळ उडाली. कारण या वेळी तिथे हवामान खूपच ढगाळ होते. (हे सर्वांना आधीच माहीतही होतं.)
चार मिनिटांच्या खग्रास सूर्याची ‘डायमंड रिंग’ (दोन वेळा) तसंच चंद्रबिंबावरच्या दऱयाडोंगरांमधील सूर्यकिरणांनी निर्माण केलेले लालसर बेलीज बीड्स (मणी) आणि सौरज्वाला तसंच तेजस्वी ‘करोना’ म्हणजे सूर्याचे प्रभामंडल कॅमेऱयात नोंदण्यासाठी ढगांच्याही वर जाणं उपयुक्त ठरतं. ‘नासा’सारख्या संशोधन संस्था आणि काही हौशी लोक ते साध्य करतात. बाकीच्यांना आकाशाकडे अपेक्षेने नजर खिळवून बसावं लागतं. परवाच्या ग्रहणाने प्रेक्षकांना बऱयापैकी ‘दर्शन’ दिलं हेही काही कमी नाही!