शांतोकडेच बांगलादेशचे नेतृत्व, टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर

आगामी महिन्यात होणार्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मंगळवारी बांगलादेशचा 15 सदस्यीय संघ जाहीर झाला. बांगलादेश बोर्डाने नजमुल हुसेन शांतो याच्याकडेच बांगलादेश संघाचे नेतृत्व सोपविले आहे. शांतोला या वर्षाच्या प्रारंभीच सर्व फॉरमॅटमध्ये बांगलादेशचा कर्णधार बनवण्यात आले होते.

अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त यजमानीमध्ये यंदाचा टी-20 वर्ल्ड कप रंगणार आहे. अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. शाकिब 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपपासून सर्व वर्ल्ड कप खेळलेला आहे. अफिफ हुसैन आणि हसन महमूद राखीव म्हणून स्पर्धेत सहभागी होतील.

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेनंतर शाकिबने जवळपास वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी शाकिबचा बांगलादेश संघात समावेश करण्यात आला होता. त्याने चौथ्या सामन्यात चार विकेट टिपत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बांगलादेशने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्धची 5 सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकली.

n बांगलादेशचा समावेश ‘ड’ गटात ः यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशला दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेदरलॅण्ड्स आणि नेपाळसह ‘ड’ गटात ठेवण्यात आले आहे. संघाचा पहिला सामना डलास येथे 7 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

n टी-20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेश संघ ः नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद (उपकर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन, शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, जखार अली, तन्वीर इस्लाम, महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तनजीम हसन.

n राखीव खेळाडू ः हसन महमूद, अफिफ हुसेन.

डच संघाचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सच्या हाती

– अॅमस्टरडॅम ः बांगलादेशपाठोपाठ नेदरलॅण्ड्सनेही आपला टी-20 वर्ल्ड कपचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यांनी यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या स्कॉट एडवर्ड्सकडे संघाचे नेतृत्व सोपविले आहे.

– नेदरलॅण्ड्सचा संघ ः स्कॉट एडवर्ड्स (यष्टिरक्षक-कर्णधार), वेस्ली बरेसी, मायकल लेविट, मॅक्स ओडाऊड, विक्रमजीत सिंह, बास दी लीडे, सीब्रॅण्ड एंजलब्रेश्ट, तेजा निदामनुरू, टीम प्रिंगल, आर्यन दत्त, विवियन किंगमा, फ्रेड क्लासन, लोगान वॅन बीक, पॉल दोराम, पॉल वॅन मीकरन.

– आता प्रतीक्षा पाकिस्तानी संघाची ः आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी 19 संघांनी आपले 15 सदस्यीय संघ जाहीर केले असून फक्त पाकिस्तानने आपला संघा जाहीर केलेला नाही. त्यामुळे बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघात कुणाकुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.