40 कोटींची रोकड; अजूनही मोजणी सुरू, पादत्राणांच्या व्यापाऱ्याकडं सापडलं घबाड; IT चे अधिकारी हैराण

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथे पादत्राणांच्या तीन व्यापाऱ्यांवर केलेल्या छापेमारीमध्ये अगणित संपत्ती सापडली आहे. अधिकाकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 40 कोटींची रोकड, कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी कार आणि इतर संपत्ती सापडली आहे. अद्यापही रोख रकमेची मोजणी सुरू आहे.

आग्रा येथील पादत्राणांचे व्यापारी रामनाथ डांग यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. या छापेमारीनंतर त्यांच्या घरात 500 च्या नोटांचा खजिना सापडला आहे. डांग यांच्या घरामध्ये एवढ्या नोटा सापडल्या आहेत की गेल्या 24 तासांपासून याची मोजणी सुरू आहे. आयकर विभागाने नोटांची मोजणी करण्यासाठी बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेतली आहे.

आयकर विभागाने आतापर्यंत 40 कोटी रुपयांची मोजणी केली आहे. हा पैसा नक्की कुठून आला याचा हिशोब मिळालेला नाही. इतर रकमचेही मोजणी सुरू आहे. डांग यांनी आयकर आणि इतर गोष्टींमध्ये फेरफार केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. याबाबत खबऱ्याने माहिती दिल्यानंतर पादत्राणांच्या व्यापाऱ्यांच्या घरावर छापे टाकले.

याआधी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे आयकर विभागाने छापे टाकले होते. बंशीधर तंबाखू कंपनीवर टाकलेल्या छापेमारीत कोट्यवधींची अवैध संपत्ती सापडली होती. ही कंपनी कानपूरसह मुंबई, दिल्ली, गुजरातमध्ये व्यवसाय करते. आयकरमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर आयटीने 20हून अधिक ठिकाणी छापे टाकले.

या कंपनीने कागदांवर आपला टर्नओव्हर 20-25 कोटी रुपये असल्याचे दर्शवले होते. मात्र अधिक चौकशी केली असता कंपनीचा टर्नओव्हर 100-150 कोटी रुपये असल्याचे समोर आले. त्यानंतर आयकर विभागाने छापे टाकले. या छापेमारीनंतर 60 कोटींहून अधिक रकमेच्या लक्झरी कार जप्त करण्यात आल्या होत्या.