
>> प्रा. अनिल कवठेकर
चित्रपट पंढरीच्या वारकऱयांचा पांडुरंग भेटीचा सोहळा म्हणजे ऑस्कर पुरस्कार होय. उत्तम करण्याचा ध्यास घेणाऱया दिग्दर्शकाचे स्वप्न म्हणजे ऑस्कर पुरस्कार! देशातील चित्रपटप्रेमींचा मान, अभिमान, स्वाभिमानाचा जल्लोष म्हणजे ऑस्कर पुरस्कार होय. ऑस्कर पुरस्कार मिळण्याच्या आधीपासून ‘नाटो नाटो’ (नाचो नाचो) या गाण्याने संपूर्ण जगाला नृत्याच्या मोहिनीने मोहून टाकले होते. या गाण्यावर हजारो लोकांनी रिल्स बनवले. या गाण्याच्या स्टेप्स शिकवणारे हजारो व्हिडीओ आले. आपल्या देशातलेच नाही तर अमेरिका, जपान, कोरिया इथल्या नृत्यप्रेमी लोकांना या गाण्याने वेड लावले.
फेसबुकवर क्रिकेटपटू, उद्योजक, हिंदी-दक्षिण फिल्म इंडस्ट्री हॉलीवूडचा सुपरस्टार टॉम क्रूज या सर्वांनी या गाण्याची या गाण्यातल्या नृत्याची खूप तारीफ केलेली आहे… आणि त्यातच ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर या नृत्याने सगळय़ानांच वेड लावले.
मूळ तामिळ भाषेतले नाटो, नाटे या शब्दाचा हिंदी अनुवाद नाचो, नाचो असा होतो आणि त्याच गाण्याचे हिंदीमध्ये केलेले रूपांतर, त्यातील प्रत्येक शब्द, प्रतिमा, उपमा या सगळय़ातून आपल्या देशाच्या संस्कृतीची छाप दिसते. आपल्या देशातील संस्कृतीचे वर्णन येते. हे गाणे हिंदीतून अनेक वेळा ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर या गाण्यातील देशीपणा, जिवंतपणा, वेग, गती, लय, सौंदर्य, हालचाली, झटके, नजाकत, चपळता, अभिनय या सर्वांच्या सौंदर्याने हे गाणे आपल्याला त्या नृत्याच्या वारंवार प्रेमात पडायला भाग पाडते.
या नृत्यात संघर्ष आहे. देशप्रेम आहे. मित्रप्रेम आहे. द्वेष आहे. करुणा आहे आणि हे सगळे अगदी सहजपणे या नृत्यात येऊन गेलेले आहे. त्या दोघांचे नृत्य पाहिल्यानंतर लक्षात येते की, ते अगदीच अद्भुत आहे. दोघा नायकांच्या अंगात रौद्र आणि वीर रस एकाच वेळी संचारल्यासारखे वाटतात. इंग्रज व्यक्तिरेखेच्या मनात या दोघा नायकांच्या विषयी प्रचंड घृणा आहे. तर इंग्रज तरुणींच्या मनात यांच्याविषयी करुणा आणि प्रेम आहे. तो इंग्रज या दोघा नायकांच्या अंगावर धावून जातो तेव्हा त्यांच्या चेहऱयावर खोटे का होईना भयाचे भाव आहेत. नीटपणे पाहिले तर या गाण्यात आपल्याला नवरस पाहायला मिळतात. हे सौंदर्य कदाचित त्या ऑस्करच्या परीक्षकांच्या लक्षात आलेले असावे. या गाण्याला ओरिजनल सॉंग असा ऑस्कर पुरस्कार देणाऱया परीक्षकांच्या दृष्टिकोनाला, त्यांच्या वैश्विक संस्कृतीच्या अभ्यासाला मोठी दाद द्यायला हवी. आपल्या देशी गाण्यातून त्यांना आपल्या देशातील संस्कृती, शेतीप्रधान देशाचे वैशिष्टय असणारा बैल, जत्रेत, यात्रेत वाजणारा ढोल, मिरचीचा ठेचा, कच्च्या पैऱयांची चव, तव्यावरच्या जाड रोटय़ा, विंचूचा डंख… या सगळ्या संकल्पना त्यांना समजल्यामुळेच त्यांनी या गाण्याला ओरिजनल गाणे असा ऑस्कर पुरस्कार दिलेला आहे. ओरिजनल सॉंग म्हणजे नेमके काय?
या गाण्याचे एक वैशिष्टय म्हणजे एखाद्या उत्तम गुरूने आपल्या शिष्याला एखादा विषय शिकवताना त्या विषयासंदर्भात खूप सोपी व असंख्य उदाहरणे देऊन तो विषय सोपा करावा, तसाच हा देशी नाच करताना तो नाच कसा झाला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कोणाप्रमाणे करायला पाहिजे, या सगळ्याची उदाहरणे या गाण्यामध्ये आलेली आहेत. त्या ओळींचा अर्थ पाहिल्यावर आपल्या सहजच हे लक्षात येईल.
या गाण्यातील पहिल्या कडव्यातील पहिली ओळ सुरू होते ‘बैल जैसे धूल उडाके सिंग उठा के तुम भी नाचो’ मुळातच असा बैल पाहण्यासाठी तुम्हाला गाव किंवा खेडय़ातच जावे लागणार. खेडय़ात गेल्यानंतरच असा धूळ उडवत, शिंग उभारून धावणारा बैल जत्रेमध्ये किंवा बैलगाडीच्या शर्यतीमध्ये धावताना दिसेल. धावताना अशा बैलाला ज्यांनी पाहिलेले आहे त्यांनाच या गीतातील शब्दांचा अर्थ कळेल. बैलाचा तुफानी वेग व त्याचे आक्रमक रूप, क्षणभर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा या बैलगाडयांच्या शर्यती होतात, तेव्हा उत्साह केवळ त्या बैलातच असतो असे नाही तर तो त्या बैलाला पळवणाऱयामध्येही असतो. तुफान वेगाने धावणाऱया बैलाला समजून घेतल्याशिवाय त्याची आक्रमकता, त्याचा वेग, शारीरिक हालचाली, त्याच्या प्रत्येक कणाकणातून प्रकट होणारे असे हे नृत्य आहे.
‘बाजे जमके ताल ढोल बेटा राजू उडके नाचो’ या ओळीवर ढोलावर पडणाऱया आघाताबरोबर वाजवणाराही जागेवर नृत्यासह उडी मारत वाजवत असतो. हे ढोल वाजवणाऱयासारखे नाचायचे आणि उडायचेही आहे. ‘तीरो से भी तेज कोई कर सके जो भेद नाचो’ धनुष्यातील बाणापेक्षाही अधिक गतीने भेद करणारे जर काही शस्त्र्ा असेल तर ते शस्त्र्ा म्हणजे तुमचे शरीर! त्या शरीराला बाणाची गती देऊन नाचा. शरीरामधल्या शक्तीचा नृत्यात उपयोग झाला पाहिजे हे गीतकार अप्रत्यक्षपणे गीतातून आपल्याला सांगत आहे.
‘अस्तबल मे घोडे जैसे बागडोर छोड नाचो’ जसे घोडय़ांना पागेमध्ये आणल्यावर त्यांच्या गळ्यात व पाठीवर असणारी सगळी बंधने काढून टाकली जातात आणि मोकळे सोडल्यानंतर मुक्ततेचा आनंद घेत ते जसे चौफेर उधळून नाचतात तसेच मनावर लादलेली बंधने झुगारून मुक्ततेने नाचायचे आहे. कारण जगामध्ये नाचण्यासारखा दुसरा आनंद नाही.
‘मिट्टी जोता रोटा मोटा मिरची खाके ऐसा नाचो’
या ओळीतील शब्द अगदी टिपिकल खेडय़ातले आहेत. जिला आपण रोटी म्हणतो ती थोडीशी नाजूक असते. आकाराने पातळ असते पण ज्याला रोटा म्हणतात तो अतिशय जाड असतो. मातीच्या तव्यावर असा जाड रोटा टाकून तो जळू नये म्हणून त्याला वारंवार फिरवला जातो. त्याला चांगला भाजला जातो. त्याचे हे सारखे फिरवणे म्हणजेच त्या तव्यावरच्या रोटय़ांचे नृत्य आहे. अशा जाड जाड रोटय़ांबरोबर हिरवी मिरची खाताना होणाऱया जिभेची आग मस्तकात शिरते आणि सगळ्या अंगाला झिंग येते नंतर सुरू होतो थयथयाट, अगदी तसेच नाचा. पुढच्या कडव्यातले…
‘नाचो नाचो नाचो नाचो नाचो नाचो नाचो वीरे नाचो
नाचो नाचो नाचो नाचो नाचो नाचो नाचो यारा नाचो
नाचो नाचो नाचो कच्ची पैरी जैसा खट्टा नाचो
नाचो नाचो नाचो बिच्छू काटा लागे ऐसा नाचो…’
वीरासारखे नाचा. मित्रासारखे नाचा आणि हे सांगताना कच्ची पैरी खाल्ल्यानंतर विलक्षण सुखद चवीच्या आंबटपणाने सारे अंग शहारून जाण्याच्या अनुभवातून व्यक्त होणाऱया हालचालीतून नाचा. असे कवी मस्त सांगून जातो. रस्त्याने जाताना अचानक अनवाणी पायाला विंचवाने दंश करावा आणि त्यामुळे होणाऱया आगीमुळे शरीराची जी नृत्यमय अवस्था होते असा दंश झालेल्या व्यक्तीसारखे नाचा.
‘शोर सुनलो धमाका जैसे शेर हाती नाचो’
जंगलातल्या श्वापदांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींच्या गोंधळात आणि धमाक्यात जसे ते एकमेकांवर आक्रमण करताना डरकाळ्या, गरजतात तसे तुम्हांला नाचायचे आहे. म्हणजेच नाचताना प्रचंड शक्ती, जोर आणि ऊर्जा शरीराच्या प्रत्येक अवयवातून दिसायला हवी. तशी ऊर्जा दोन्ही कलाकारांच्या नृत्यातून दिसते.
‘देखो दिल का ये मेला यारा अपने साथ नाचो
एडियो के जोरो पे धुमधडाका देसी नाचो
वो पसीना माथे का चमके दम के ऐसे नाचो’
मनापासून नाचणाऱयांची ही गर्दी आहे. मित्रा तुलाही तसेच नाचायला लागेल. पायाच्या टाचेवर जोर देऊन धुमधडाका करणारा देशी नाच नाचो. नाचताना असे नाचा की तुझ्या कपाळावर आलेल्या घामाच्या थेंबांचे
कपाळावर नृत्य सुरू व्हायला हवे असे नाचो.
‘नाचो नाचो नाचो उसने चखा लागे तीखा नाचो’
नाचण्याचा राग पुन्हा छेडला गेलेला आहे. ज्याने हा नाचण्याचा राग चाखला आहे. तिखट लागला आहे आणि तिखट लागल्यानंतर होणाऱया थयथयाट करून आपल्याला नाचायचे आहे.
‘झुमे गांव है रेला ऊंचा पाव यु पटका
है देसी एक मेला पैसा रहा यकायकी ’
यात नायक त्या इंग्रजाला सांगतोय की, अशाप्रकारे आमच्या गावात गर्दीमध्ये नृत्य केले जाते आणि ते ठरवून केले जात नाही. अचानकपणे केले जाते. हे आमचे देशी नृत्य कसे वाटले असा प्रश्न नायक विचारत आहे.
शेवटच्या कडव्यातील ओळींचा अर्थ पाहूया…
‘अरे घूम घुम थिरिकेज्या पाव पे जान लगा
धुमक धुमक नाचे जा दुनिया हिला दे सारी
नाचो नाचो नाचो’
असे वेगाने गोलाकार फिरताना तुझा जीव तुझ्या पायामध्ये यायला हवा. असे काही वेगळे करशील तरच ही दुनिया गोंधळून जाणार आहे. आश्चर्यचकित होणार आहे. इतके ते सुंदर आणि वेगवान असले पाहिजे की, पाहणाऱयाला नवल वाटले पाहिजे म्हणून नाचो. ‘नाचो’ हा शब्द एकूण 65 वेळा आलेला आहे. इतक्या वेळा शब्दांची पुनरुक्ती होऊनही या गाण्याचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. उलट ‘नाचो’ शब्दाने या गाण्याला अनेक पैलू पाडले आहेत. म्हणूनच जगातील सगळ्या भाषांमधील हे गाणे आपले वाटलेले आहे.
हे ऑस्कर विनिंग गाणे राहुल सिपलींगगुंज आणि विशाल यांनी लिहिले आहे. युद्ध सुरू असलेल्या युव्रेनमध्ये या गाण्याचे शूटिंग झालेले आहे. चित्रपटाला भव्यता येण्यासाठी तसेच अप्रतिम लोकेशन शोधणे हीसुद्धा एका चांगल्या दिग्दर्शकाची मोठी जबाबदारी असते. त्या नृत्याच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱया राजवाडय़ाचसुद्धा या गाण्याच्या यशात मोठा वाटा आहे. 20 दिवस 43 टेक आणि 110 स्टेप्स अशी रचना करून प्रेम रक्षित याने या नृत्य बसवलेले आहे. शूटिंग संपल्यानंतरही दोन्ही कलाकार सहा ते नऊपर्यंत या गाण्याच्या नृत्यांचा सराव करत होते. शेवटच्या स्टेपपर्यंत दिग्दर्शकाला आवश्यक असणारे बदल करायला सर्व तयार होते. म्हणूनच हे इतके सुंदर नृत्य आज आपल्याला पाहायला मिळतेय. यात दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचाही मोठा वाटा आहे. म्हणूनच हा चित्रपट जगातील सर्वात मानाचा असणारा ऑस्कर पुरस्कार घेऊन आलेला आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)





























































