शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 50 कोटी हडपले; अजित पवारांचा नुसताच कोरडा दम

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिह्याचे पालकमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा ते बीडमध्ये येतात तेव्हा तेव्हा ते ‘भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज अधिकाऱ्यांना सोडणार नाही!’ असा दम देऊन जातात. परंतु त्यांच्या दमबाजीत कोणताही दम नसल्याचे दिसून येत आहे. बीड जिह्यात एकामागोमाग एक अधिकाऱ्यांचे घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या अनुदानामध्ये तलाठी, कृषी सहायक आणि अधिकाऱ्यांनी शेती नसणाऱ्या सग्यासोयऱ्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे वळवले आहेत. 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम अधिकाऱ्यांनी हडप केली आहे.

ज्यांच्या नावावर शेती नाही किंवा शेती एकाची ‘आठ अ’वर नाव दुसऱ्याचे असे पर्याय निर्माण करून रकमा उचलण्यात आल्या आहेत. अनुदानासाठी जे खरोखरच पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची केवळ केवायसी करण्यात आलेली आहे. त्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झालेला नाही. अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील या घोटाळ्याच्या तपासणीसाठी वेगवेगळे अधिकारी नेमले. काही तालुक्यांची चौकशी पूर्ण झाली आहे, तर काही तालुक्यातील चौकशी अद्याप अपूर्ण आहे. यानंतर घोटाळ्यांचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात चौकशी

प्रत्येक तालुक्यामध्ये चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमले आहेत. काही ठिकाणचा अहवाल प्राप्त झाला आहे, तर काही ठिकाणचा अहवाल अद्याप मी पाहिलेला नाही. या प्रकरणी माहिती घेऊन आपणास सांगतो, असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.