
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी टर्निंग पॉईंट असणारी बारावीची परीक्षा आज १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यातून १ लाख ८ हजार ५४ विद्यार्थी बारावीच्या परीक्षा देणार आहेत. यासाठी १९३ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांची विद्यार्थ्यांवर करडी नजर असणार आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. या परीक्षेसाठी ५५ हजार ५७६ विद्यार्थी तर ५२ हजार ४७८ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. तसेच विशेष महिला पथकाचाही समावेश असणार आहे.
जिल्ह्यामध्ये अंबरनाथ येथील एक परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या केंद्रावर पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. या परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.





























































