राज्यातील नोकऱ्यांत मागासवर्गीयांच्या 1 लाख 30 हजार जागा रिकाम्याच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजाच्याही आरक्षणाचाही प्रश्न तापू लागला असतानाच महाराष्ट्रातील सरकारी नोकऱयांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्तांसहित ओबीसींची तब्बल 1 लाख 30 हजार पदे रिकामीच आहेत असे उजेडात आले आहे.

त्या रिकाम्या जागा भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवण्याची नितांत गरज आहे, पण त्याबाबत उदासीन असलेल्या फडणवीस सरकारने तर नोकरभरतीवरच बंदी आणलेली आहे, असे माजी सनदी अधिकारी आणि महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक-अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे यांनी दैनिक ‘सामना’ला सांगितले. सरकारी नोकऱयांतील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीत विशेष भरती मोहीम राबवण्यात आली होती याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीचे वाटप नाही

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये 2010 पासून म्हणजे गेल्या आठ वर्षांत वाढच करण्यात आलेली नाही. परिस्थिती अशी असतानाच गेल्या दोन वर्षांपासून तर त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटपसुद्धा झालेले नाही, अशी माहिती खोब्रागडे यांनी दिली. दर दोन वर्षांनी महागाईच्या निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ होणे अपेक्षित आहे. आठ-आठ वर्षे त्याबाबतीत सरकार हालचाल करीत नाही. त्यावरून मागास समाज शैक्षणिकदृष्टय़ा प्रगत होऊ न देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकताच उघड होते असे सांगून ते म्हणाले की, शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये करण्याची गरज आहे.