पश्चिम रेल्वेचे वाजले तीनतेरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेच्या गार्डस्नी अचानक ओव्हरटाईम करण्यास नकार देत नियमाप्रमाणे काम करण्यास सुरूवात केल्याने पश्चिम रेल्वेच्या १० फेऱया रद्द करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेकडे १३२ गार्डस् जागा रिक्त असून त्यामुळे गार्डस्वर मानसिक तणाव येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाने म्हटले आहे.

यासंदर्भात वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस अजय सिंह यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनाने गार्डने लोकलची फेरी संपवून रनिंग रूममध्ये विश्रांतीसाठी जाण्यापूर्वी त्यांना स्टेशन मास्तरांकडे जाऊन रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. तसेच बोरिवली प्लॅटफॉर्म क्र. ८ वर गाडी टर्मिनेट झाली असेल तर गार्डने पुन्हा प्लॅटफॉर्म क्र.१० वरील स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना रिपोर्ट द्यावा असे सांगण्यात आले आहे. हा एक प्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रकार असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. गार्डस् नी अशा प्रकारे काम करण्यास आणि ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्याने १० लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने गार्डस्ना समजविण्यात आले असून हे प्रकरण मिटल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. परंतु १३२ गार्डस्च्या जागा रिक्त असून पश्चिम रेल्वे प्रशासनाला गार्डस् संपूर्ण सहकार्य करीत आहेत. असे असताना हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे सिंह म्हणाले.

गार्डस्कडून दबाव आणण्याचा प्रयत्न

हा गार्डस्कडून दबाव आणण्याचा प्रयत्न असून त्याचा सेवांवर काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला असून हा वाद आता संपला असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे तर दुसरीकडे आमच्यावर अशा प्रकारे अनावश्यक कामे लादण्यात आली तर आम्ही आमच्यावरील अन्यायाविरोधात निदर्शने करू असे एका मोटरमनने सांगितले.