
ऑस्ट्रेलियातील एका दहा वर्षीय मुलीने खेळणी विकून महिनाभरात तब्बल एक कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. वाचून आश्चर्य वाटले ना…परंतु हे खरे आहे. पिक्सी कर्टिस असे या मुलीचे नाव आहे. पिक्सी आपली आई रॉक्सी हिच्यासोबत फिजेट्स आणि रंगीबेरंगी पॉपिंग खेळणी बनवते. तिच्या खेळण्यांना इतकी मागणी आहे की त्या हातोहात विकल्या जातात.
पिक्सीची आई रॉक्सी यांनी सांगितले, ‘माझ्यासाठी सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे माझ्या मुलीमध्ये एवढय़ा लहान वयात असलेली उद्योजकता आहे. माझ्यात अशी प्रतिभा कधीच नव्हती. मलाही यशस्वी व्हायचे होते, परंतु माझ्या मुलीने इतक्या कमी वयात व्यवसाय यशस्वी करून माझे स्वप्न पूर्ण केले आहे. माझ्या मुलीमुळेच मला उद्योजक बनण्याची संधी मिळाली.’ पुढे त्या म्हणाल्या, ‘आम्ही पिक्सीसाठी सर्व नियोजन केले आहे. जेणेकरून ती वयाच्या 15 व्या वर्षी रिटायरमेंट घेऊ शकेल.’ पिक्सी सध्या सिडनीतील एका प्राथमिक शाळेत शिकतेय.



























































