100व्या नाट्यसंमेलनाची सांगता कधी… रत्नागिरीचा समारंभ पुढे ढकलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली येथे 101 वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन होणार असून त्याचे अध्यक्षपद डॉ. मोहन जोशी भूषविणार आहेत. याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. मात्र अद्याप दोन वर्षे उलटूनही 100 व्या ऐतिहासिक नाटय़ संमेलनाची सांगता झालेली नाही.

रत्नागिरी येथे 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान शंभराव्या नाटय़ संमेलनाचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता, मात्र आता तोदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

यासंदर्भात नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे म्हणाले, रत्नागिरी नाटय़संमेलन सांगता समारंभ आयोजित करणाऱया शाखा पदाधिकाऱयांशी संपर्क साधला. सांगता समारंभ भव्यदिव्य करण्याच्या दृष्टीने त्यांना अधिक वेळेची आवश्यकता आहे असे कळले. त्यामुळे रत्नागिरी येथील संमेलन पुढे ढकलण्याची त्यांची विनंती रास्त आहे असे वाटले. लवकरच नियामक मंडळाची सभा आयोजित करण्यात येईल. त्या सभेतील चर्चेनंतर सांगता समारंभाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल.

बोरिवलीचे संमेलनही पुढे जाण्याची शक्यता
बोरिवली येथील 101 वे नाटय़संमेलन मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मात्र जोपर्यंत शंभराव्या संमेलनाची सांगता होत नाही तोपर्यंत 101 व्या संमेलनाची नांदी होणार नाही. त्यामुळे बोरिवली नाटय़संमेलन पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.