
राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याच्या निर्णयास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात असून त्यासाठी 101 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती नेमण्यात आली आहे.
राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पात 101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या प्रकल्पाचे स्वरूप आणि प्राधान्याने कोणती कामे हातात घ्यावी व या कामांचा तपशील ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्त्राr शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत शाळांमध्ये भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिका आयोजित करण्यात येतील.
प्राचीन मंदिरांचा वारसा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले 300 किल्ले हा महाराष्ट्राचा समृद्ध ठेवा आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रातच आहेत. गेल्या सहाशे वर्षांत वारकरी संप्रदायाने देशपातळीवर महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण केली असून आळंदी, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आणि अष्टविनायक परिक्रमा हे महाराष्ट्राच्या सामाजिक-आध्यात्मिक जीवनाचा प्राण आहेत. महाराष्ट्राची पुलस्वामिनी तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकामाता व सप्तशृंगी ही आद्य मातृदेवतांची साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रातच आहेत.



























































