108 ऍम्ब्युलन्स सेवेसाठी 26 कोटींचा निधी, लाखो रुग्णांचे वाचवले जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जखमींसाठी राज्य सरकारने  सुरू  केलेल्या 108 टोल फ्री ऍम्ब्युलन्स सेवेला राज्याच्या आरोग्य विभागाने 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्ण सेवेमुळे आतापर्यंत लाखो जणांचे प्राण वाचले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने 26 जानेवारी 2014 रोजी 108 क्रमांकाची मोफत इमर्जन्सी ऍम्ब्युलन्स सेवा सुरू केली. या हेल्पलाइनवर फोन केल्यास काही वेळेतच डॉक्टरसहित सुसज्ज ऍम्ब्युलन्स घटनास्थळी येते. आतापर्यंत या सेवेमुळे लाखो जणांचे प्राण वाचले आहेत. रस्ते अपघातापासून हार्ट ऍटॅक, प्रसूती, इमारत दुर्घटना, स्फोट अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत 108 ही ऍम्ब्युलन्स सेवा मदतीला धावून जाते.

आता या ऍम्ब्युलन्स सेवेसाठी ऍप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून कोणत्याही अँड्रॉईड मोबाईलवर हा ऍप डाऊनलोड करून घेता येतो. त्यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, वय आदी तपशील सादर करावा लागतो. रुग्णाला कोणत्या स्वरूपाची वैद्यकीय मदत हवी त्याचा ‘ऑप्शन’ मोबाईल क्रीनवर येतो. त्याच्यावर क्लिक केल्यास दहा सेकंदांत मदतीचा संदेश हेल्पलाइनवर जातो. ही सेवा जीपीआरएस सेवेद्वारे जोडली असल्याने वैद्यकीय मदत मागणारी व्यक्ती कोणत्या भागात आहे त्याची माहिती मिळते. त्या आधारावर ऍम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचते. हे ऍप डाऊनलोड केलेल्या व्यक्तीला जवळच्या नातेवाईकाचे किंवा मित्रांचे संपर्क क्रमांकही या सेवेकडे नोंदवण्याची सोय आहे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या नातेवाईकांनाही माहिती देण्याची सोय यामध्ये आहे.

आषाढवारीपासून अपघातग्रस्तांना मदत

 या ऍम्ब्युलन्स सेवेचा फायदा अगदी वारकऱ्यांपासून अपघातग्रस्तांना झालेला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून वारकरी आषाढीच्या वारीला जातात. वारीच्या मार्गावर 108 सेवेच्या ऍम्ब्युलन्स तैनात करण्यात येतात. आपत्कालीन परिस्थितीत वेळीच मदत मिळाल्याने अनेक वारकऱयांचे प्राण वाचले आहेत. माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत या ऍम्ब्युलन्सनी पूर्णवेळ मदतकार्य केले होते. काही वर्षांपूर्वी खंडाळा येथे एसटीची बस दरीत कोसळली होती. 108 च्या इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या सहा ऍम्ब्युलन्स दहा मिनिटांत  घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सोलापूरमधील टेंभुर्णीजवळ झालेल्या अपघाताच्या वेळेस या सेवेच्या तीन ऍम्ब्युलन्स विसाव्या मिनिटाला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचल्या होत्या. ही सेवा जीवनदायी सेवा म्हणून ओळखळी जाते.

937 ऍम्ब्युलन्सची सेवा

आपत्कालीन मदतीसाठी राज्यात 233 ऍडव्हान्स लाईफ सपोर्टिंग व 704 बेसिक लाईफ सपोर्टिंग अशा एकूण 937 ऍम्ब्युलन्ससची सेवा सुरू आहे.