दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा एकदा वाढ केली आहे. कागद, छपाई आणि प्रशासकीय खर्चात वाढ झाल्याचे कारण देत मंडळाने ही शुल्कवाढ लागू केली असून, मागील चार वर्षांतील शुल्कवाढीचा क्रम पाहता, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

एकीकडे सर्वसामान्य पालक महागाईने त्रस्त झालेले असतानाच आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यात जास्तीची भर घातली आहे. सलग चौथ्या वर्षीही दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली आहे. मार्च 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सुधारित शुल्क आकारले जाणार आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी असलेले परीक्षा शुल्क आता 470 करून 520 करण्यात आले आहे, म्हणजेच थेट 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे परीक्षा शुल्कही वाढविण्यात आले आहे. आता शुल्क 490 करून 540 झाले आहे. शिक्षण मंडळाने केलेल्या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सातारा जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सावरण्यास केळच दिला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. यानंतर परतीच्या पावसानेही फलटण आणि माण तालुक्यांना अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. खरीप हंगाम वाया गेला, फळबागा उद्ध्वस्त, पशुधन वाहून गेले. अशा अस्मानी संकटानंतर ही पालकांवर परीक्षा शुल्क वाढीचा बोजा पडणार आहे.

चार वर्षांपासून वाढता आलेख

दहावी, बारावी परीक्षा शुल्कात मागील चार वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. कागद, छपाई आणि प्रशासकीय खर्च वाढल्याचे यासाठी कारण देण्यात आले आहे.

अतिरिक्त शुल्काचाही भर

विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क 20 असून, गुणपत्रिका लॅमिनेशन शुल्क 20 आहे. तसेच प्रात्यक्षिक शुल्क 200 रुपये असे आकारण्यात येणार आहे.