उड्डाणपुलावरून खाली पडून 11 काळविटांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर महामार्गावरील घटना; तीन जखमी

सोलापूर-विजापूर महामार्गावरील केगाव परिसरात असलेल्या उड्डाणपुलावरून पडून 11 काळविटांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तीन काळविटे मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेने सोलापूरकरांमध्ये संतापाची भावना उमटली असून, या मुक्या प्राण्यांच्या मृत्यूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वन विभागाने या परिसरातील रस्त्यावर वन्यप्राण्यांकरिता अंडर पासची सोय तसेच जाळी लावण्याची सूचना केली होती. त्याकडे दुर्लक्ष केल्याने 11 काळविटांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सोलापूर जिह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. या महामार्गाच्या निर्मितीवेळी वन्यजीव प्राण्यांच्या अधिवासाचा विचार न करता रस्तेनिर्मिती करण्यात येत आहे. सोलापूर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील केगावजवळ उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलालगत रस्त्यासाठी 40 फुटांची भिंत असून, या भिंतीवरून पडून 11 काळविटांचा जागीच मृत्यू झाला आहे. सायंकाळच्या सुमारास या परिसरातील काळविटांचा जथ्था रस्त्यावरून निघालेला होता. रस्ता ओलांडत असताना समोरील रस्त्याचा अंदाज न आल्याने या भिंतीलगत असलेल्या पुलावरून एकामागोमाग एक 14 काळविटे खाली पडली. यात 11 काळविटांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन काळविटे गंभीर जखमी झाली आहेत. या जखमी काळविटांवर उपचार करण्यात येत आहे. याची माहिती गावकऱयांना कळताच पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

या परिसरात काळवीट व वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. या प्राण्यांकरिता रस्ता व उड्डाणपूल तयार करताना अंडरपासची सुविधा देणे आवश्यक होते किंवा रस्त्याच्या कडेला जाळी मारणे क्रमप्राप्त होते; परंतु या मुक्या प्राण्यांच्या अधिवासासंबंधी विचार केलला नसल्याचे या घटनेवरून समोर आले.

चौकशी करून अहवाल देणार : धैर्यशील पाटील

महामार्गावर घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, या संबंधीचा अहवाल वन विभागाकडे देण्यात येणार आहे. यापूर्वी रस्ते प्राधिकरणाकडे या परिसरातील वन्यजीवांचा विचार करून अंडरपास मार्ग व रस्त्याच्या कडेला जाळी मारण्यासंबंधी वेळोवेळी सूचना केली होती. ती अद्यापही अंमलात न आल्याने या प्राण्यांना जीवानिशी मुकावे लागले, असे सोलापूर विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांनी सांगितले. सोलापुरात सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद व सांगोला परिसरात वन्यजीवांचा अधिवास अधिक असून, विशेषकरून काळविटांची संख्या अधिक असल्याने या महामार्गावर वन्यप्राण्यांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.