
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी येथे मोहम्मदी रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव बसने सायकलला धडक दिल्याने दुर्घटनेत सायकलवरील महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर तिच्याजवळ असलेला 11 महिन्यांचा चिमुरडा सुखरुप बचावला आहे. रिटा (22) असं या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती रणजित हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मोहम्मदी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
रिटा आणि रणजित आपल्या मुलासह मोहम्मदी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी सायकलवरून आले होते. मात्र शाहजहांपूर बस डेपोतून भरधाव आलेली बस थेट सायकलवर चढली. यावेळी रिटाचा जागीच मृत्यू झाला, तर रणजित गंभीर जखमी झाला. मात्र रिटाच्या जवळ असलेला 11 महिन्यांचा चिमुकला बाजूला जाऊन पडल्यामुळे बचावला.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित बस जप्त केली असून, फरार झालेल्या बस ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.



























































