मिंध्यांप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनाही खोक्यांचा हव्यास , 11 महसूल अधिकारी निलंबित

mantralay

मिंधे सरकारमधील अधिकाऱ्यांनाही आता खोक्यांचा लोभ सुटला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील क्रीम पोस्टसाठी दुष्काळी परिस्थिती असलेल्या विदर्भ, मराठवाडय़ातील बदल्या नाकारणाऱ्या महसूल विभागातील 11 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात बदली आदेश काढूनही हे अधिकारी पाच महिन्यांनंतरही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नव्हते.

महसूल विभागात पैसे देऊन क्रीम पोस्टिंग मिळवण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. अशा बदल्यांसाठी अधिकारी लाखो रुपये मोजतात. मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या माध्यमातून रातोरात अशा बदल्या केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वीच उघड झाला होता. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्या बदल्या विदर्भ, मराठवाडय़ात केल्या गेल्या, परंतु असे 11 अधिकारी पाच महिन्यांनंतरही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

बदली रद्द करण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या बंगल्यावर मुक्काम
गेल्या एप्रिलमध्ये महसूल विभागात 35 अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन बदल्या झाल्या, परंतु ते अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. महसूल विभागाने त्यांना नोटिसा बजावल्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी बदली थांबवण्यासाठी त्यांनी बराच आटापिटाही केला होता. अनेक अधिकारी बदली रद्द करण्यासाठी रात्री-अपरात्रीही महसूल मंत्र्यांच्या बंगल्यावर ये-जा करत होते.

तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर असे राज्यात सहा महसूल विभाग आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये पोस्टिंग झाल्यास महसूल अधिकारी एका पायावर तयार होतात, पण अमरावती किंवा नागपूरमध्ये त्यांना बदली नको असते. नागपूर विभागात सात तहसीलदारांची बदली करण्यात आली होती, परंतु रुजू न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.

निलंबन झालेले तहसीलदार

  • सरेंद्र दांडेकर (धानोरा गडचिरोली)
  • बी. जे. गोरे (ऐटापल्ली गडचिरोली)
  • विनायक थविल (वडसादेसांगज, गडचिरोली)
  • सुचित्रा पाटील (करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक)
  • सुनंदा भोसले (खरेदी अधिकारी, नागपूर)
  • बालाजी सूर्यवंशी (अप्पर तहसीलदार, नागपूर)
  • पल्लवी तभाने (संजय गांधी योजना, वर्धा)
  • निलंबित निवासी उपजिल्हाधिकारी
  • इब्राहिम चौधरी (यवतमाळ)
  • अभयसिंह मोहिते (नगर)