मिंध्यांचे नमो नमो! पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील मिंधे सरकारने ‘नमो नमो’चा गजर करीत 11 कलमी विकास कार्यक्रमाची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस देशात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने मिंधे सरकारनेही 11 कलमी कार्यक्रम जाहीर केला. यात नमो महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. नमो कामगार कल्याण अभियानातून 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्यात येणार आहेत. 73 हजार शेततळी, 73 आत्मनिर्भर गावे, 73 ग्रामपंचायती बांधणे, 73 आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी करणे, ‘नमो दिव्यांग शक्ती अभियान’अंतर्गत 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्रे उभारणे, ‘नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान’अंतर्गत 73 क्रीडा संकुले उभारणे, ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’अंतर्गत 73 ठिकाणी शहर सौंदर्यीकरण प्रकल्प आणि ‘नमो तीर्थस्थळे व गडकिल्ले संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत 73 पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी नाही
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नयेत, यासाठी राज्यात ओबीसींचे आंदोलन सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही अशीच भूमिका आहे आणि सरकारही याच मानसिकतेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करण्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.