
सामना प्रतिनिधी । मुंबई
अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये मागासावर्गीय कोटा रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला मिळालेली स्थगिती उठली असून शनिवारपासून अॅडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. तेरावीची पहिली यादी १९ जूनला जाहीर झाली होती तर दुसरी यादी २२ जूनला जाहीर होणार होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे तेरावीची प्रवेशप्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर बंद झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार क मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वेाच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. ही विशेष अनुमती याचिका शुक्रवारी न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
कायदेशीर सल्ला घेणार
सर्वेाच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांना घटनात्मक आरक्षण कशा पद्धतीने देता येईल यासंदर्भात राज्य शासन व मुंबई विद्यापीठ हिंदुस्थानचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांच्याकडे कायदेशीर सल्ला मागणार आहे.
पदवी प्रवेशाची आज दुसरी यादी
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार आता द्वितीय गुणवत्ता यादी आता १४ जुलै आणि तृतीय क अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै रोजी २०१८ संलग्नित महाविद्यालयांत लागणार असून प्रवेशाबाबतचे सविस्तर सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.



























































