सांगली जिल्ह्यात 12 हजार हेक्टरला अवकाळीचा फटका, कृषी विभागाकडून राज्य शासनाकडे प्राथमिक अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावसामुळे जिह्यातील द्राक्ष, ज्वारी, हरभरा, भाजीपाल्यासह 11 हजार 939 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिह्यातील जवळपास साडेदहा हजार हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने राज्य शासनाकडे हा प्राथमिक अहवाल पाठवला आहे. शासनाने अद्यापि पंचनाम्याचे आदेश दिलेले नाहीत; मात्र येत्या दोन दिवसांत पंचनामे सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सांगली जिह्यातील पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, वाळवा, जत तालुक्यांतील काढणीला आलेल्या सर्व द्राक्षबागा मातीमोल झाल्या आहेत. पाणी साचून द्राक्ष घड कुजू लागले आहेत. यामुळे द्राक्ष काढून फेकून देण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे. ऊसही शेतातच कुजू लागला आहे. अनेक ठिकाणी तोडलेला ऊस गुडघाभर चिखल व पाण्यातून बैलगाडीने बाहेर काढला जात आहे. बहुतांश ठिकाणी ऊसतोडणी मजुरांचे हाल सुरू आहेत.

द्राक्ष पिकाबरोबर रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज वेताळ यांच्यासह अधिकाऱयांनी द्राक्ष व इतर पिकांची प्राथमिक माहिती घेऊन सरकारकडे नुकसानीचा प्राथमिक अंदाज पाठवला आहे. जिह्यातील 384 गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे 26 हजार 842 शेतकऱयांच्या जवळपास अकरा हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार दहा हजार 639 क्षेत्रातील द्राक्षबागांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. द्राक्षबागांचे नुकसान प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेले नसले तरी ते सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात डाळिंबाचे 343 हेक्टर, मका 56 हेक्टर, भाजीपाला 168 हेक्टर, हरभरा 140 हेक्टर आणि इतर पिके 53 हेक्टर, तर मिरज तालुक्यातील भाजीपाला 65 हेक्टर, तर हरभरा 14 हेक्टर, गहू 4 हेक्टर, वाळवा तालुक्यात भाजीपाला 35 हेक्टर, हरभरा 131 हेक्टर, गहू 6 हेक्टर, ज्वारी 354 हेक्टर आणि इतर पिके 54 हेक्टर क्षेत्रातील मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

कातरखटाव परिसरात पिकांचे नुकसान

कातरखटाव आणि परिसरात झालेल्या पावसाने भागातील सर्व ठिकाणच्या ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कातरखटाव परिसरात पावसाळ्यामध्ये एकाही ओढ्याला पूर आला नव्हता; परंतु या अवकाळी पावसाने सर्व ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. दोन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. या भागातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे असलेले ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. कणसेवाडी परिसरातील प्रसिद्ध असणारी दगडी ज्वारीचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा पिकात पाणी साचल्याने कांद्याची पात पिवळी पडली आहे. यांसह गहू, हरभरा, मका, ऊस, कांदा आदी पैसे मिळवून देणाऱ्या पिकांचेही फार मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे – खासदार संजय पाटील

जिल्ह्यात अवकाळीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. द्राक्ष, ऊस पिकांचे तसेच भाजीपाला व इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तातडीने करावेत आणि सध्या वीज कंपनीकडून थकीत वीजबिलासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. ती तातडीने बंद करावी, अशी मागणी सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.