ठाण्यात 15 दिवसांत 124 बेकायदा बांधकामांवर हातोडा; न्यायालयाच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांना दिसल्या इमारती

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर झोपलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. पालिका प्रशासनाने अवघ्या 15 दिवसांत पालिका हद्दीतील 124 बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकत इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम.के. कंपाऊंडमधील 18 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतरच पालिकेच्या अधिकाऱ्यांना उभ्या राहिलेल्या इमारती दिसल्या का? असा सवाल ठाणेकर विचारत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे. प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली बेकायदा बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर बेकायदा बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ती बांधकामेही तोडण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

निसर्गरम्य येऊर आणि खाडीपात्राच्या हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही आता कारवाई सुरू केली आहे. तसेच खाडीकिनारी बेकायदा भरणीवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील अनेक बेकायदा बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक आहे. काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आल्यानंतर ही बांधकामे सुरू होती त्यांनादेखील दणका देण्यात आला.

या बांधकामांचा समावेश
बेकायदा चाळी, बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, आरसीसी इमारतीचे बांधकाम, बेकायदा बंगले, नाल्यालगत उभारण्यात आलेले बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडाऊन, क्रिकेट टर्फ या प्रकारची बेकायदा बांधकामे लक्ष्य करत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. ही कारवाई अशीच नियमितपणे सुरू राहणार असल्याचा इशारा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दिला असल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.