
सीबीएसईसह सर्व शिक्षण मंडळांनी कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत त्याच धर्तीवर सर्व मंडळांनी बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे. त्यासाठी सोशल मीडियावर जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला देशभरातील विद्यार्थी, पालकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
सध्याची कोरोनाची परिस्थिती भयावह असून अशा परिस्थितीत बारावीची परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरणार नाही, यातून त्यांच्या आरोग्य आणि जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे देशातील बहुतांश विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर केली आहे. काही लाख विद्यार्थ्यानी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवून बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली असून पालक संघटनांचाही हीच मागणी मागील काही दिवसांत केली असल्याचे इंडिया वाइड पेरेंटस् असोसिएशनच्या पदाधिकारी अॅड. अनुभा सहाय यांनी सांगितले.


























































