कोपरगाव स्टेशनरोडवरील अतिक्रमणांवर हातोडा; 130 अतिक्रमणे जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासकीय हद्दीतील साईबाबा चौफुली ते रेल्वे स्टेशन शिंगणापूररस्ता शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांवर बुधवारी 10 ते 12 तास धडक कारवाई करून सुमारे 130 अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील टपऱ्या, पत्र्याचे शेड, झोपड्या, दुकाने यांचा समावेश आहे. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून टपऱ्या, कच्ची पक्की झोपडीवजा अतिक्रमणे काढून घेतली. या अतिक्रमण धारकांना आपली अतिक्रमणे 15 दिवसांच्या आत काढून घ्यावी म्हणून नोटीस बजावल्या होत्या. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हातोडा पडल्याने सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

येथील सा.बां. उपविभागीय अधिकारी कार्यालय यांनी 25 फेब्रुवारी रोजी 100 ते 150 जणांना नोटीस बजावल्या होत्या. शासकिय हद्दीत अतिक्रमण केलेबाबत उपरोक्त विषयान्वये रस्त्याची पाहणी केली असता कोपरगाव- पढेगाव- वैजापूर रस्ता (रामा 65) किमी 103 / 200 ते 105/200 मध्ये रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला रस्त्याच्या मध्यापासून 40 मीटरच्या आतमध्ये शंकर बापू थोरात, साहेबराव थोरात, गोरख थोरात, संगीता पवार आदींनी अतिक्रमण केलेले होते.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तसे पत्र पोलीस ठाण्यास दिले होते, सदरची नोटीस मिळताच 15 दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घ्यावे. तसे न केल्यास आपण केलेले अतिक्रमण सरकारी खर्चाने दूर करण्यात येऊन त्यावर झालेला खर्च आपणाकडून वसूल केला जाईल व आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, अशी तंबी ही बजावलेल्या नोटीसमध्ये उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम यांनी नमूद केली, तरीही अतिक्रमण धारक उठत नव्हते. तब्बल तीन महिने याबाबत पाठपुरावा सुरू होता. आज पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्याने उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वर्षराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांचे पथक दोन जेसीबी दोन ट्रॅक्टर तसेच चार पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक उत्तमराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली 28 अंमलदार, 9 महिला होमगार्ड पथकाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

शहरातील अतिक्रमणे काढणे गरजेचे
सार्वजनिक विभागाने दोन्ही बाजूकडील 40 मीटरपर्यंतचे अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवावे अन्यथा या प्रश्नावरून आपण सत्याग्रह करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात गेली वर्षानुवर्ष अतिक्रमणाचा प्रश्न भिजत घोंगडे म्हणून पडलेला आहे. अतिक्रमणे काढली जातात की, परत नव्याने उभी केली जातात त्यामुळे शहरातील अतिक्रमणे काढणे आता पुन्हा एकदा गरजेचे झाले आहे, असे पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले आहे. त्यावर पुन्हा कधी हातोडा पडणार याची पुन्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.