
जेडी पराडकर । संगमेश्वर
कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता गणेशोत्सवादरम्या १३२ स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई, एलटीटी, दादर, पुणे स्थानकातून सोडण्यात येतील.
या विशेष रेल्वेगाड्यांसाठी आजपासून चाकरमानी बुकींग करु शकणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना आरक्षित तिकिट मिळणे सोपे होणार आहे. मुंबई ते सावंतवाडी या विशेष रेल्वेच्या ४४ फेऱ्या होणार आहेत. ५ ते ३० सप्टेंबर दरम्यान आठवड्यातील ६ दिवस (गुरुवार वगळता) ही रेल्वे धावणार आहे. दररोज रात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून (०१००१) सुटून सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडीहून (०१००२) दुपारी ३ वाजता सुटून मुंबईला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहचेल.
मुंबई ते सांवतवाडी दुसऱ्या विशेष रेल्वेच्या ८ फेऱ्या करण्यात येणार आहेत. ६ ते २७ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ही (०१००७) गाडी सुटणार असून दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ही गाडी सावंतवाडीला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ही गाडी (०१००८) गुरुवारी दुपारी ३ वाजता सुटणार असून मुंबईला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहचणार आहे.
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झराप या स्थानकांवर बहुतांश विशेष रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. सीएसएमटी-रत्नागिरी (०१०३३) रेल्वे सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी-पनवेल (०१०३४) रेल्वे रात्री १० वाजून ५० मिनिटांनी सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल.
पनवेल-सावंतवाडी-मुंबई या विशेष रेल्वेच्या २२ फेऱ्या होतील, या फेऱ्या ७ ते १७ सप्टेंबरदरम्यान दररोज होणार आहेत. पनवेल-सावंतवाडी रेल्वे सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी-मुंबई रेल्वे (०१०३६) रात्री ११ वाजता सुटणार असून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पोहचणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरीदरम्यान ‘एसी डबल डेकर’ गाडीच्या ६ फेऱ्या होणार आहेत. ४ ते १८ सप्टेंबरदरम्यान दर मंगळवारी ही गाडी धावणार आहे.
पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी एलटीटी-रत्नागिरी (०११८७) एसी डबल डेकर रेल्वे सुटून रत्नागिरीला दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे. तर रत्नागिरी-एलटीटी (०११८८) एसी डबल डेकर ट्रेन दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी सुटून एलटीटीला रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, ख्रेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकात या गाडीला थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला एसी चेअर कारचे ६ कोच असणार आहेत. याशिवाय एलटीटी-पेरनम, एलटीटी-झराप रेल्वेच्या प्रत्येकी ८ फेऱ्या, पुणे-सावंतवाडी २ फेऱ्या ,पनवेल-सावंतवाडीच्या ४ फेऱ्या आणि पनवेल-रत्नागिरी-पुणे रेल्वेच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.



























































