कुटुंब करतेय ड्रग्जची तस्करी; कश्मीरहून मुंबईत विकायला आणलेले 14 कोटींचे चरस पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरहून उच्च प्रतीचा चरस मुंबईत विकायला आणणाऱया एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कौटुंबिक टूरला जात असल्याचा देखावा करत चरसची तस्करी करणाऱया मुख्य ड्रग्ज तस्करासह त्याची पत्नी, मुलगी आणि जावयाला पोलिसांनी पकडले आहे. कारमध्ये वेगवेगळ्या कॅविटींमध्ये लपवून कश्मिरी चरस त्यांनी आणला होता. दहिसरमध्ये त्यांना पकडून पोलिसांनी तब्बल 24 किलो वजनाचा व 14 कोटी 40 लाख किमतीचा चरस हस्तगत केली आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकांकडून ड्रग्जमाफियांविरोधात धडक कारवाया सुरू आहेत. गेल्या आठवडय़ात घाटकोपर युनिटने एका ड्रग्ज तस्कर महिलेला पकडून 21 कोटी  60 लाख किमतीचा हेरॉईन ड्रग्ज जप्त केला होता. त्यानंतर सोमवारी गुन्हे शाखा युनिट-6 व 7 च्या पथकांनी मुंबईतल्या नशेबाजांसाठी कश्मीरहून आणलेला 24 किलो उच्च प्रतीचा चरस दहिसर येथे पकडला. बंडू उदानशिवे हा चरसची तस्करी करणारा मुख्य तस्कर असून तो कश्मीरहून रस्ते मार्गाने चरस आणत असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर व रवींद्र सांळुखे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय गावडे, चव्हाण, अर्चना कुदळे, मीरा देशमुख, उपनिरीक्षक रामदास कदम व पथकाने बंडूच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला व त्याच्या कुटुंबाला दहिसरमध्ये कारने येताच कश्मिरी चरससह पकडले.

कारमध्ये कॅविटी बनवून लपवाछपवी

पोलिसांनी बंडू व त्याच्या कुटुंबीयाला दहिसरमध्ये पकडले तेव्हा ते एका कारमध्ये होते. त्या कारची तपासणी केली असता कारचे दरवाजे तसेच डिकीमध्ये कॅविटी बनविलेल्या सापडल्या. त्या कॅविटींमध्ये चरस लपविण्यात आली होती. इतकी लपवाछपवी करूनही पोलिसांनी चरस पकडून तस्करांना गजाआड केले.  ती चरस ते मुंबईत कोणाला विकणार होते याचा शोध सुरू असल्याचे उपायुक्त नलावडे म्हणाले.

टुर्सच्या नावाखाली करत होते तस्करी

बंडू हा कश्मिरी चरसचा मोठा तस्कर आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो तस्करी करतोय. गंभीर म्हणजे या कामात त्याला त्याची पत्नी क्लेरा, मुलगी सिंथिया आणि जावई जासर शेख हे साथ देतात. 2010 मध्ये वरळी युनिटने बंडूला 39 किलो चरससह पकडले होते. बंडू त्याच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन टुर्सला जात असल्याचा देखावा करून कश्मीरला जातो आणि तेथून येताना कश्मिरी चरसचा साठा मुंबईत आणतो. कुटुंब सोबत असल्यावर  कोणाला संशय येणार नाही आणि पकडले जाणार नाही अशी त्याची मोड्स ऑपरेंडी असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. दर महिन्याला बंडू चरस आणायला कश्मीरला जातो.