
15 ऑगस्ट, वेळ सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटे (19ः29), महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. धोनीची निवृत्ती ही अनपेक्षित नसली तरी घोषणेसाठी 15 ऑगस्ट ही तारीख आणि 19ः29 ही वेळच का निवडली याचे गूढ आता धोनीचे चाहते शोधू लागले आहेत. सोशल मीडियावर धोनीच्या निर्णयामागील थिअरी रंगू लागली आहे.
धोनीसोबत सुरेश रैना यानेही निवृत्तीची घोषणा केली. धोनीचा जर्सी नंबर 7, तर रैनाचा 3. हे दोन्ही अंक एकत्र केले तर अंक 73 होतो. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून 73 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच दोघांनीही स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधला असावा, असे एकाने ट्विट केले आहे. विशेष म्हणजे या ट्विटला सुरेश रैनानेही हिंदुस्थानी तिरंग्याचा इमोजी टाकून प्रतिसाद दिला आहे.
काही चाहत्यांनी ‘19ः29’ याचे उत्तर शोधले आहे. 2019 मध्ये हिंदुस्थानी संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपचा उपांत्य सामना हरला होता. तेव्हा घडय़ाळात वाजले होते. 19ः29. धोनीचा तो अखेरचा एकदिवसीय सामना होता. म्हणूनच धोनीने घोषणा ‘19ः29’ वाजता केली, असे चाहत्यांचे म्हणणे! चर्चा तर जोरात सुरू आहे. 1929 हा अंक जादुई किंवा ईश्वरी संकेताचा अंक म्हणून मानला जातो. याचा तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे आणि ईश्वरी कृपेने तुमची वाटचाल आता दुसऱया टप्प्याच्या दिशेने योग्य मार्गावरून सुरू आहे. धोनीने त्याच्या मेसेजमध्ये वेळ नमूद करताना 19ः29 ऐवजी 1929 असे नमूद केले याकडे चाहते लक्ष वेधतात.
एकाने तर धोनीच्या निवृत्तीला आर्थिक मंदीशीच जोडले आहे. ‘1929’मध्ये जागतिक मंदी आली हाती त्याचा येथे संबंध असू शकतो अशी या चाहत्याची थिअरी आहे.
धोनी सच्चा देशभक्त, म्हणूनच 15 ऑगस्ट
धोनीने आपल्या पूर्ण कारकीर्दीत हिंदुस्थानी संघासाठी मोठे योगदान दिले आहे. तो खऱया अर्थाने एक सच्चा देशभक्त आहे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीला रामराम करण्यासाठी 15 ऑगस्टपेक्षा जास्त चांगला दिवस धोनीसाठी सापडलाच नसता. गेल्या काही दिवसांपासून धोनीची निवृत्तीबद्दलची चर्चा सुरू होती, पण त्याने कधी निवृत्ती घ्यायची हे ठरवले नव्हते. यापुढे आयपीएल हे त्याचे प्राधान्य असणार आहे; अशी माहिती धोनीचा मॅनेजर मिहीर दिवाकर याने दिली.


























































