जालन्यात 15 लाख रुपयांचे भेसळयुक्त बायोडिझेल जप्त; जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई

जालना जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने पनवेलकडून रायपूर छत्तीसगडकडे जाणारे 15 लाखांचे भेसळयुक्त बायोडिझेल शुक्रवारी रात्री जालन्यात पकडले आहे. वाहतूक करणारा टँकर जप्त आणि बायोडिझेल करुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने 15 लाखांचे डिझेल आणि 15 लाखांचा टँकर असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल या विभागाने जप्त केला असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा निरीक्षक प्रकाश शिवाजी जाधव यांना खबऱ्याकडून टँकर येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसय्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा निरीक्षक गजानन शिवलाल मोरे आणि काही साक्षीदार सोबत घेत शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जालना- देऊळगाव राजा रोडवर पानशेंद्रा शिवारामध्ये खाजगी वाहनाने पोहचत टँकरची वाट पाहिली. रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास जालन्याकडून टँकर येत असल्याचे दिसले. या टँकरला थांबवून टँकरची कागदपत्रे आणि टँकरमधील मालाविषयी विचारणा केली असता, टँकरचा चालक मच्छिंद्र भाऊसाहेब मस्के (रा. सावरगाव, ता. आष्टी, जि.बीड) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मालकाने न्यू आजीवली व्हीलेज (ता. पनवेल जि. रायगड) येथून हे टँकर भरून दिले आहे आणि ते रायपूर छत्तीसगडकडे नेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे हा टँकर नेत असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान अधिकाऱ्यांना त्याने कोणतीच कागदपत्रे दिली नसल्याने टँकरमधील बायोडिझेलचा नमुना तपासणीसाठी काढून घेत भेसळयुक्त बायोडिझेलने भरलेले हे टँकर तालुका पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले आहे. टँकर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या संजय शामराव गंगे (रा. गंगेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 15 लाख रुपयांचा टँकर आणि 15 लाख रुपयांचे भेसळयुक्त बायोडिझेल असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये जिल्हा पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.