
अवघ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरातच मुलाला जन्म देऊन स्वतःच बाळाची नाळ कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सध्या संबंधित मुलगी व तिच्या नवजात बाळावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिल फारुख शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या मोठ्या बहिणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मुलीची बहीण असून, 31 जानेवारीला सकाळी माहेरी आईकडे आल्या होत्या, मात्र त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. थोडय़ा वेळाने त्यांचा भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यावर लहान बहिणीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच घरातील दरवाजाजवळ रक्ताचे डाग पडलेले दिसून आले. खिडकीजवळ एक नवजात बाळ ठेवलेले दिसल्याने तक्रारदार महिलेला धक्का बसला. लहान बहिणीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने घरातच डिलिव्हरी झाल्याचे सांगितले.





























































