लोकसभा सचिवालयाच्या मनमानीमुळे मराठी खासदारांची दिल्लीत निवार्‍यासाठी वणवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा सचिवालयाच्या मनमानीमुळे 16 मराठी खासदार राजधानी दिल्लीत बेघर झाले आहेत. कुणी घर देता का घर… असा संतप्त सवाल ते करत आहेत. हे खासदार महाराष्ट्रातून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. जुन्या खासदारांची घरे रिकामी होत नाहीत तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात त्यांनी महाराष्ट्र सदनात आश्रय घेतला होता. परंतु 27 जानेवारीला लोकसभा सचिवालयाने त्यांना धक्का देत दोन दिवसांत महाराष्ट्र सदन रिकामे करण्याचे फर्मान काढले.

यंदा लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या सर्वपक्षीय मराठी खासदारांची संख्या जास्त असल्याने त्यांची व्यवस्था नवीन महाराष्ट्र सदनात करण्यात आली होती. तशा सूचना त्या वेळी लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सदनाच्या प्रशासनाला दिल्या होत्या. लोकसभा सचिवालयाने 27 जानेवारी रोजी एक पत्र पाठवून महाराष्ट्र सदनात तात्पुरत्या निवासाला असलेल्या खासदारांची व्यवस्था वेस्टर्न कोर्टमध्ये करण्यात आल्याचे अचानक कळवले. त्यामुळे अधिवेशनासाठी दिल्लीत आलेल्या खासदारांना अर्थसंकल्पाऐवजी अगोदर आपल्या खोलीतील सामानाची बांधाबांध  करावी लागली. वेस्टर्न कोर्टमध्येही पुरेशी व्यवस्था नसल्यानेही  खासदार नाराज आहेत.

नवनीत राणा, चिखलीकर यांच्यावर मेहेरनजर?

लोकसभा सचिवालयाने भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर आणि अमरावतीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा यांच्यावर मात्र विशेष मेहेरनजर दाखवली आहे. या दोघांच्या निवासाची व्यवस्था लोकसभा सचिवालयाने याअगोदरच केली आहे.

सदन रिकामी न केल्यास दरदिवशी सहा हजार भरा

खासदारांना कायमस्वरूपी निवासस्थान मिळत नाही तोपर्यंत तात्पुरत्या निवासाच्या खर्चाची व्यवस्था लोकसभा सचिवालय करत असते. पर्यायाने ही रक्कम त्या त्या राज्याच्या विश्रामगृहांना मिळते. नवीन महाराष्ट्र सदनातील एका दिवसाचा निवासाचा खर्च सर्वसामान्य नागरिकांसाठी 6 हजार रुपये इतका आकारला जातो. मात्र खासदारांना यात सवलत असते. दोन दिवसांत महाराष्ट्र सदनाची खोली रिकामी केली नाही तर महाराष्ट्र सदनातील रूमचे भाडे तुम्हाला स्वतःच्या पैशाने भरावे लागेल, अशी तंबीही या पत्रात देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर सदनाचे अधिकारी ताळ्यावर

महाराष्ट्र सदनातून खासदारांना चालते व्हा, असे आदेश दिल्याने संतप्त झालेल्या खासदारांनी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी आदित्य ठाकरेंशी संपर्क साधला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांना आदेश दिल्यानंतर सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय आज सदनातून बाहेर काढलेल्या खासदारांना ‘आप यही रहो’ असे आर्जव करताना दिसून आले.