आमदार अपात्रता प्रकरण – पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला

आमदारांच्या अपात्र प्रकरणावर आज विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. ही सुनावणी संपली असून आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.

सोमवारी दुपारी आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानभवनाच्या मध्यवर्ती कार्यालयात सुनावणी सुरू झाली. यावेळी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत, आमदार अॅड. अनिल परब, सुनिल प्रभू आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तीवाद करत आमदारांच्या अपात्रतेसंबंधी दाखल सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. मात्र मिंधे गटाने याला विरोध करत सर्व याचिकांवर वेगवेगळी सुनावणी घेण्याची मागणी केली. आता याचिंकावर एकत्र सुनावणी करायची की वेगवेगळी सुनावणी करायची याबाबत 13 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर यांनी गेल्या 14 सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त करतानाच एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. तिथे त्यांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी घेण्याचे ठरले. ही सुनावणी आता संपली असून पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक संध्याकाळपर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.